दैनिक स्थैर्य | दि. 14 जुन 2024 | फलटण | फलटण शहरामध्ये दत्तनगर भागामध्ये फलटण नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे भटकी गाय सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये पडली होती. ही माहिती फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांना कळताच त्यांनी तातडीने स्वतःची यंत्रणा राबवत सदरील भटक्या गाईला सेफ्टी टँकमधून बाहेर काढून जीवदान दिले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा फलटण नगर परिषदेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की; आज रविवार दि. 14 रोजी सकाळी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा यांना दत्तनगर भागातून फोन आला; या फोनमध्ये असे सांगण्यात आले की; गाय सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टँकमध्ये पडली आहे. तिचे फक्त डोकेच वर दिसत आहे. तरी तिला बाहेर काढून जीवदान देणे गरजेचे आहे. हे समजतात शहा यांनी स्वतःची यंत्रणा राबवत सदरील गाईला जीवदान देण्यामध्ये ते यशस्वी ठरले.
फलटण नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच अनेक आणि अडचणींचा सामना करावा लागतो. यासोबतच आता मुक्या जनावरांना सुद्धा नगरपरिषदेच्या गलथान कारभाराला सामोरे जावे लागत आहे. फलटण नगर परिषदेच्या सार्वजनिक शौचालयाच्या सेफ्टी टॅंक मध्ये जर जनावर पडत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आज भटके जनावर सदरील सेफ्टी टँक मध्ये पडले होते परंतु आगामी काळात जर कोणता लहान मुलगा किंवा ज्येष्ठ नागरिकाच्या बाबत अशी घटना झाली तर याला सर्वस्वी फलटण नगरपरिषदेचे प्रशासन जबाबदार राहील.
– अनुप शहा,
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, फलटण शहर.