स्थैर्य, निढळ, दि.३१: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. एन. उर्फ धनंजय नामदेवराव जाधव यांचे नवी मुंबईतील नेरुळमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मंगळवार (30 मार्च) पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली आहेत. जाधव यांच्या निधनानंतर पुसेगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली.
यावेळी, सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, सलामी गार्ड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, खटाव राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना नेते नरेंद्र पाटील, संदीप मांडवे, राजेंद्र कचरे यांच्या सहित पंचक्रोशीतील हजारो लोकांनी साश्रु नयनांनी जाधव यांना अखेरचा निरोप दिला. तसेच काही कालावधीसाठी पुसेगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.