दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळे येथे बुधवार, दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी वनविभाग फलटण यांचेमार्फत वनाधिकारी श्री. राहुल निकम, माजी प्राचार्य श्री. इंगळे सर, ग्लोबल अर्थ फाउंडेशनचे सचिन जाधव, कुलदीप ढमाळ, ज्येष्ठ नागरिक नारायण निंबाळकर यांनी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत व सत्कार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती काकडे मॅडम यांनी गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन केला.
याप्रसंगी माजी प्राचार्य इंगळे सर यांनी पशूपक्षी यांच्या संवर्धनाबद्दल सुंदर माहिती सांगितली. बिबट्याचा राजाळे पंचक्रोशीच्या परिसरात असणारा वावर याची माहिती दिली. वनाधिकारी श्री. राहुल निकम यांनी बिबट्यासंबंधी माहिती दिली तसेच त्यांनी पर्यावरणविषयक ‘झाड’ या कवितेचे व व्यसनमुक्तीवर सुंदर गीत गायन केले.
याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता दहावी ‘क’मधील श्रीनाथ शेडगे याने प्रतापगडच्या रणसंग्रामाच्या पोवाड्याचे गायन केले. त्याबद्दल माजी प्राचार्य श्री. इंगळे यांनी अर्धा डझन वह्या बक्षीस दिल्या.
सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. निंबाळकर सर यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. जगताप मॅडम यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.