किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास येत्या दीड वर्षात पूर्ण करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । मुंबई । मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या 18 महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पोरपॉइस या प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या अभ्यासामध्ये मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या इतर सागरी सस्तन प्राण्यांच्या नोंदी करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीतील करण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या या पहिल्या अभ्यासात मुंबई महानगरातील साधारण ७० किमी (उत्तर – दक्षिण) किनारपट्टीचा समावेश करण्यात येणार आहे.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेला हा प्रकल्प संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट १५, २०२० मध्ये घोषित केलेल्या Project Dolphin या दूरदर्शी उपक्रमाला अनुसरून असून त्यामुळे देशातील नद्या व खाड्यांमधील डॉल्फिनच्या संरक्षण व संवर्धनात मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून हा प्रकल्प सुरु होणार असून कांदळवन प्रतिष्ठान आणि कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन (CCF) स्वायत्त संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.सदर प्रकल्पाचे अभ्यास क्षेत्र उत्तरेकडील वैतरणा नदीच्या मुखापासून सुरू होऊन दक्षिणेकडील ठाणे खाडी तसेच बृहन्मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतचा पश्चिम समुद्र किनारा व्यापेल. या क्षेत्रामध्ये बॅक बे, हाजी अली आणि माहीम खाडी यांसारख्या अनेक खाड्या तसेच एमएमआर क्षेत्रामधील मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वैतरणा या पाच नदीच्या मुखांचा समावेश असेल, जे डॉल्फिन आणि पॉरपॉइज या दोन प्रमुख  प्रजातींच्या अधिवासाचा अभ्यास करतील.

समुद्री सस्तन प्राण्यांच्या अधिवासाची प्राधान्ये, खाद्य आणि मत्स्यव्यवसायाशी त्यांचे परस्परसंवाद तपासण्यासाठी विस्तृतपणे अभ्यास करण्यात येणार आहे. पाण्यातील समुद्री सस्तन प्राण्यांच्या प्रजातीला मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके ओळखणे हा यामागील उद्देश असून किनाऱ्यावरील मासेमारीमुळे ह्या प्रजातींचे जाळ्यात अडकल्यामुळे जाळ्यांचे नुकसान होऊ शकते तसेच त्यांच्या परिसंस्थेवर कसा परिणाम होतो हे यामुळे समजण्यास मदत होणार आहे, असे वनमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानने महाराष्ट्राच्या काही किनारी प्रदेशांमध्ये किनाऱ्या जवळ असणाऱ्या समुद्री सस्तन प्राण्यांच्या (डॉल्फिन आणि पॉरपॉइज) वैज्ञानिक अभ्यासासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. या वर्षी जूनमध्ये, कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशनद्वारे केलेल्या प्राथमिक संशोधनात दक्षिण मुंबईच्या बॅक बे क्षेत्रात इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिनची संख्या आणि त्यांच्या अधिवासाचा वापर निर्धारित केला आहे ज्यामध्ये, २७ वेळा (डॉल्फिनचे) दर्शन झाले. कांदळवन प्रतिष्ठानाने मुंबई किनाऱ्यानजीकच्या सस्तन प्राण्यांची (डॉल्फिन आणि पोरपोईस) माहिती मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, दिल्ली यांना PROJECT DOLHPIN अंतर्गत सादर केला आहे. या प्रकल्पाची अंदाजित रक्कम ३३.१६ लाख रुपये आहे. या अभ्यासामुळे वन अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी होऊन संवर्धनाच्या प्रयत्नांत वाढ होईल. आम्ही मच्छिमार गावे, जीवरक्षक, सफाई कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांच्यासोबत जनजागृती सत्र आयोजित करून मुंबई महानगरामधील मरीन रिस्पॉडंट स्ट्रँडिंग नेटवर्क मजबूत करण्याची योजना आखण्यात येणार आहे.

महाराष्ट्र किनाऱ्यावरील प्रवाळ भिंतींच्या प्रायोगिक प्रकल्पालाही मान्यता

सी एस आय आर – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (NIO) ला विविध प्रणाली वापरून प्रायोगिक तत्वावर कोस्टल रोड च्या समुद्राकडील भागातील निवडक स्थळी प्रवाळ भिंत तयार करण्याकरिता नियामक मंडळाने परवानगी दिली. ह्या प्रकल्पाचा कालावधी १ वर्ष असून त्याकरिता लागणारा निधी रू. ८८ लाख आहे. मुंबई उपनगरातील व पालघर जिल्ह्यातील पहिल्या कांदळवन निसर्ग परिचय केंद्र, मारंबळपाडा प्रकल्पाला नियामक मंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.


Back to top button
Don`t copy text!