स्थैर्य, सातारा, दि.१३: झेंडूच्या फुलांनी सजवलेला किल्ले अजिंक्यतारा, राजसदरेवर काढलेल्या रांगोळय़ा, सनईचा मंजूळ स्वर, तुताऱयांचा निनाद, अशा शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्याताऱयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहु महाराज यांचा राज्याभिषेक व सातारा शहराचा स्थापना दिन तथा 11 वा सातारा स्वाभिमान दिवस शाही पद्धतीने उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उपक्रमात किल्ल्यावर विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचा देशात पहिला मान साताऱयाला मिळाला. या सभेत अजिंक्यताऱयांच्या विकासाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
दरम्यान, छत्रपती शाहु महाराजांच्या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करणारे अजय जाधवराव, राजुशेठ राजपुरोहित यांचा सवयभान चळवळीचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते सातारा भूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने किल्ले अजिंक्यताऱयावर सातारा स्थापना दिन व सातारा स्वाभिमान दिन उत्साहात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, मनसेचे सातारा शहरप्रमुख राहुल पवार, भाजपाच्या दीपा झाड, दीपक भुजबळ, शिवभक्त अभि सुर्वे, मंगेश काशिद, सातारा सायकल ग्रुपचे संतोष शेडगे, डॉ. दीपक थोरात व सदस्य उपस्थित होते.
अजय जाधवराव म्हणाले, मातृसंस्था असलेल्या सातारा पालिकेची सभा होण्याचा मान भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अजिंक्यतारा गडाला मिळतोय. याला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण या किल्ल्याला आमच्यासाठी काशी विश्वेश्वराइतकच महत्व आहे. या किल्यावर महाराजसाहेब शहाजीराजे यांच्यापासून ते शाहु महाराजांपर्यंत प्रत्येक छत्रपती परंपरेचे पदस्पर्श लागलेले आहेत. तथापि अजिंक्यताऱयाचे महत्व वाढवलं ते छत्रपती शाहू महाराजांनी. त्यांनी सातारा शहराची निर्मिती केली. शहराला ग्रामदैवत नाही कारण सातारा हे खेडं नव्हतं. साताऱयाचे देणं आहे. त्याच छत्रपती शाहू महाराजांची समाधी माहुलीला आहे. तिच्या जीर्णोद्धाराचा पहिला नारळ याच कार्यक्रमात तीन वर्षापूर्वी फुटला. राजू शेठ भारावले अन् त्या समाधीचा मुहूर्त रचला. नदी पत्रात समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे त्यांनी सांगत सातारा पालिकेच्या नव्या वास्तूत छत्रपती शाहु महाराजांचे स्मारक असावे अशी भावना व्यक्त केली.
डॉ. संदीप मंहिद गुरुजी म्हणाले, मी सात वर्षापासून येतो आहे, ज्या भूमीत आपण वाढलो अशा सातारा नगरीचा या उत्सवात प्रत्येकाने आले पाहिजे. म्हणून गेल्या दहा वर्षांपासून येतोय ध्यासात कमी झालं नाही. 1674 चा शिवछत्रपतींचा राज्यभिषेक झाला. स्वतंत्र म्हणजे काय हे अनुभवले. तो सोहळा रायगडावर पार पडला, तिस्रया छत्रपतीचा राज्यभिषेक याच किल्यावर पार पडला. त्याच किल्ल्यावर आपण स्वाभिमान दिवस साजरा करत आहोत आपण भाग्यवान आहोत. खरे तर सगळे योग असतात, या आपल्या पालक संस्थेच्या माध्यमातून दुर्गावर कुठेही सर्वसाधारण सभा होत नाही.या सातारा नगरपालिकेची सभा होतेय याचा अभिमान आहे.
दीपक प्रभावळकर म्हणाले, आधी बारा वर्षे गडावर काम केलं आणि मग प्रत्यक्ष उत्सवाला सुरुवात केली. अशी बावीस वर्ष या स्वाभिमान दिनामागे इतिहास आहे. यंदा बातमी नाही पोस्ट नाही बॅनर नाही, स्वाभिमान दिनाचा उत्सव होत आहे. योगायोगाने हद्दवाढ झाली अन ज्या अजिंक्यताऱयाहने दिल्ली राखली, अटक राखली तेथेच सभा पालिकेने घेतली. किल्यावर सभा घेणारी नगरपालिका प्रथमच आहे. छत्रपती शाहू महाराज राज्यभिषेक दिन शासनाच्या कागदावर आणण्याचा प्रयत्न सफल झाला. भविष्यात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळांची बैठकही अजिंक्यताऱयावर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 1 लाख रुपयांची मदत
किल्ले अजिंक्यताऱयाला उर्जिंतावस्था आणण्यासाठी पालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, 11 वा हा स्वाभिमान दिन साजरा होत असून याला ऐतिहासिक महत्व आहे. ऍड. बनकर यांनी जो महत्वाचे विषय मांडला अजिंक्यताऱयाच्या संर्वर्धनाचा तो खूप महत्वाचा आहे. सर्वतोपरी सहकार्य बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना समितीच्या वतीने किल्ल्यावरील पहिली सभा आयोजित करण्याच्या प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले.