दैनिक स्थैर्य । दि. ०२ जानेवारी २०२३ । सातारा । ‘’भारतात आजही सामाजिक व आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचेच परिणाम निवडणुकीत आपल्याला पहायला मिळतात.भारतात लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था याद्वारे आपण लोकप्रतिनिधी निवडून देत असतो. प्रत्येक नागरिकाला सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार ,अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना, संघटना,मुक्त संचार व कोणतेही व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य ;दर्जाची व संधीची समानता;,सर्वाना व्यक्ती प्रतिष्ठा,सर्वांच्यात बंधुता व राष्ट्रीय एकता व एकात्मता असणे आवश्यक आहे. देशातले विविध प्रश्न ,समस्या सोडवण्यासाठी विचारी, प्रामाणिक सक्षम ,सदाचरणी व
सेवाभावी उमेदवार हा लोक प्रतिनिधी म्हणून निवडून दिला पाहिजे. पण कधीकधी गैरवर्तन करणारे,कायदा न मानणारे, संविधान विचारानुसार आचरण न करणारे,भेदभाव करणारे ,भ्रष्टाचारी असणारे उमेदवार जर निवडून येत असतील तर मतदार अजूनही विचारी विवेकी आहेत का प्रश्न जनतेत उपस्थित होत असतो. प्रत्येक निवडणुकीत १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. मतदार झालेल्यांनी प्रत्येक निवडणुकीत विचारपूर्वक व विवेकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हे देशाचे जबाबदार नागरिक असून त्यांनी चांगली माणसे निवडून देणे अपेक्षित आहे.उमेदवार याचेकडून पैसे घेऊन, मटन खाऊन, साड्या किंवा अन्य भेटी घेऊन, किंवा माझ्या जातीचा माणूस आहे म्हणून मतदान करणे हे चांगले कृत्य नाही. सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी तळमळ असलेला सुशिक्षित,सदाचारी,सेवाभावी,निर्व्यसनी,निर्भय आणि विवेकी विचारी उमेदवार मतदारानी निवडणून दिला पाहिजे. तरच भारतीय लोकशाही अधिक सक्षम होईल. धर्म,पंथ,देव.जात,लिंग,यांचा आधार घेऊन मत मागणे हे गैर वर्तन आहे. आश्वासनांच्या, शब्दांच्या भूलभूलय्यात न अडकता उमेदवाराचे वर्तन लोकशाही व संविधान पूरक आहे का याची चिकित्सा करूनच मतदान करायला हवे. जसे लोक तसे उमेदवार निवडून येतात म्हणून लोकशाहीसाठी मतदारांचे आचरण विवेकी हवे ‘’असे मत प्रा. डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. सौ.मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय उंब्रज या महाविद्यालयाने इंदोली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरातील बौद्धिक व्याख्यानसत्रात ‘मतदार जन जागृती ‘या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य धनाजी शामराव मोरे हे होते. सरपंच पांडुरंग माने, उप सरपंच निखील संकपाळ ,सेवानिवृत्त
मुख्याध्यापक श्री.व्यंकटराव निकम,रमेश मोरे यांची मुख्य उपस्थिती होती.
आपल्या अधिकाराचा वापर कोणत्याही आमिषाला बळी न पडता केला पाहिजे हे सांगताना ते पुढे म्हणाले की’ सैन्यात काम
करणे,एन.एस.एस.,एन.सी.सी.मध्ये सहभागी होऊन देशसेवा करणे विद्यार्थी करतात त्याचप्रमाणे मतदान हे हक्क म्हणून
बजावणे आणि योग्य व्यक्ती देश कामासाठी निवडणे हे आपले कर्तव्य आहे.मतदाराचे वय १८ झाल्यानंतर देशातील युवा व
युवती यांची जबाबदारी वाढली आहे. स्वतः प्रामाणिक राहणे,निर्व्यसनी राहणे आवश्यक असून उमेदवार दारू किंवा अन्य
खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन आपल्या मताची मागणी करत असेल तर हे त्याचे अनैतिक व समाजद्रोही कृत्य आहे हे समजून
घेतले पाहिजे. आपल्या मताची किंमत क्षुद्र ठरवणारे तसेच तरुणांना दारू पाजून त्यांना व्यसनी बनवणारे लोक प्रतिनिधी
निवडून देणे म्हणजे समाजाचा घात आहे. पिढया बरबाद करून सत्ताधारी म्हणून मिरवणे याला अर्थ नाही. म्हणूनच निवडणूक
आचार संहितेचे पालन न करणाऱ्या कोणत्याही उमेदवारास मत देऊ नये. त्यापेक्षा समाजाचे चांगले काम करेल अशा व्यक्तीलाच
मत द्यावे. आपल्या प्रभागात त्या व्यक्तीने काय काम केले, ते कायदेशीर आहे का ? लोकांचे हितासाठी ते काम करतात का हे
पाहून विचारपूर्वक मत द्यावे. कोणाचेही पैसे न घेता निर्भय होऊन ,शांततेत मतदान करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी
एन.एस.एस स्वयंसेविका यांनी सामुहिक प्रतिज्ञा घेतली आणि गावात सर्व्हे करून १८ वय ज्यांचे पूर्ण झाले आहे,त्यांनी फॉर्म
नंबर ६ भरून मतदार नावनोंदणी करा असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात धनांजी मोरे यांनी मतदार म्हणून स्वतःची
किंमत प्रत्येकाने ठेवली पाहिजे असे विचार व्यक्त केले.साक्षी पुस्तके व तनिषा कांबळे यांनी संवादसत्रात सक्रीय सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.ज्योती सावंत यांनी केले .पाहुण्यांचा परिचय करून देत सर्वांचे स्वागत प्रांजल
घाडगे हिने केले.कार्यक्रमाचे आभार अश्विनी सुतार हिने मानले. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.सुरेश साळुंखे ,प्रा.मंदाकिनी
वर्णेकर ,प्रा.आनंद मारगम,शारीरिक शिक्षण संचालक प्रा.वैशाली खाडे ,प्रा.शैलजा फाळके इत्यादी प्राध्यापक व शिबिरार्थी
उपस्थित होते.