दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२२ । पुणे । युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमांद्वारे तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (टीव्हीईटी) संस्था, कंपन्या, नियोक्ते व कामगार संघटना, धोरण निर्माते आणि विकास भागीदार यांच्याशी संवाद साधण्याची एक अनोखी संधी उपलब्ध झाली आहे.
राज्य, देश आणि जगाचा विचार करता भविष्यात जागतिक स्तरावर कुशल कामगाराची कमरता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका अहवालानुसार भारतातूनच सर्वाधिक कुशल कामगार पुरवठा होतो. आजमितीला भारत ६७ टक्के कार्यरत वयोगटातील लोकसंख्येसह या कुशल कामगारांचा पुरवठा करू शकतो. तथापि, भारतात उपलब्ध कुशल कामगारांची टक्केवारी केवळ २१ टक्के आहे. त्यामुळे कौशल्याची तफावत दूर करण्यासाठी अनेक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्यात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था (एमएसएसडीएस), (ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था) आर-सेटी, नेहरू युवा केंद्र आदी विविध संस्थांमार्फत राज्य तसेच जिल्हा स्तरावर अनेक कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतात.
यावर्षी जागतिक युवा कौशल्य दिनाची संकल्पना ‘भविष्यासाठी युवा कौशल्यांमध्ये परिवर्तन’ अशी निश्चित करण्यात आली आहे. कारण हा दिवस कोविड-१९ साथीच्या आजारातून सामाजिक-आर्थिक पुनर्प्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्नांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या आजारासोबत हवामान बदल, संघर्ष, सततची गरिबी, वाढती असमानता, वेगवान तांत्रिक बदल, लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण आदी आव्हाने एकमेकांशी जोडलेली आहेत.
कोविड काळात तरुण स्त्रिया आणि मुली, अपंग तरुण, गरीब कुटुंबातील तरुण, ग्रामीण समुदाय, स्थानिक लोक, अल्पसंख्याक गट आदी अनेक घटकांतील युवक, प्रौढ व्यक्तींना रोजगारापासून वंचित व्हावे लागले. याव्यतिरिक्त या संकटामुळे कामाच्या स्वरुपात बदल झाल्यामुळे आधीच सुरू असलेल्या संक्रमणांना वेग आला आहे. ज्यामुळे साथीच्या रोगावर मात केल्यानंतर मागणी असणारी कौशल्ये आणि क्षमतांबाबत नव्याने विचार करणे गरजेचे ठरले आहे.
तरुणांमध्ये प्रौढांपेक्षा तिप्पट बेरोजगारी असण्याची शक्यता असते आणि नोकरीमध्ये निम्न गुणवत्ता, मोठ्या श्रमिक बाजारपेठेतील असमानता यांना सतत सामोरे जावे लागते. याशिवाय, महिलांना कमी पगाराची आणि अर्धवेळ नोकरी किंवा तात्पुरत्या करारांतर्गत काम करावे लागण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी सोबत रोजगार देणारी कौशल्य सोबत असल्यास ती उपयुक्त ठरतात.
अर्थव्यवस्थेत काम देऊ शकणारी कौशल्ये, नियोक्त्यांद्वारे कामगारांकडून मागणी केलेली कौशल्ये आणि प्रत्यक्षातील युवकांमधील कौशल्ये यांच्यातील विसंगतीला संरचनात्मक (स्ट्रक्चरल) बेरोजगारी असे संबोधले जाते. तरुणांमधील ही एक मुख्य प्रकारची बेरोजगारी मानली जाते. संरचनात्मक बेरोजगारी केवळ अर्थव्यवस्थांवरच परिणाम करत नाही तर ‘शाश्वत विकास उद्दिष्टये-२०३०’ (एसडीजी#२०३०) अंतर्गतची ध्येये साध्य करण्यातही अडथळे आणू शकते.
जागतिक स्तरावर सर्वांसाठी समावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि आजीवन शिकण्याच्या संधींना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअंतर्गतच २०३० पर्यंत रोजगार आणि चांगल्या नोकऱ्यांसाठी आवश्यक तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये असलेल्या तरुण आणि प्रौढांच्या संख्येत भरीव वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्यात राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती व विभागीय स्तरावर विभागीय कौशल्य विकास कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. कुशल मनुष्यबळाचे उदिष्ट गाठण्यासाठी आराखडा तयार करण्यासोबतच कुशल मनुष्य बळास रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सहाय्यक मार्गदर्शन, नियंत्रण करणे व विभागनिहाय प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीचा आढावा समिती घेते.
साधारणपणे १५ ते ४५ या वर्षापर्यंतच्या वयोगटातील उमेदवारांना अधिक मागणी असलेल्या क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यावसायिक कौशल्य विकास, कौशल्यवर्धन द्वारे रोजगारक्षम करून त्यापैकी किमान ७५ टक्के प्रत्यक्ष नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यात येतो. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, अल्पसंख्याक यांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येतो.
पुणे जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाच्यावतीने गतवर्षात ४ रोजगार मिळावे घेण्यात आले. प्रत्येक महिन्याला एका ऑनलाईन मेळाव्याचेही आयोजन करण्यात येते. प्रत्येक रोजगार मेळाव्यातून सरासरी ३५० ते ४०० युवक व युवतींना रोजगार मिळाला आहे. वर्षभरात दोन्ही प्रकारातील मेळाव्यांच्या माध्यमातून २ हजारावर युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे.
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कुशल कामगार घडवण्याबाबतचे विविध उपक्रम, ध्येये, त्यासाठीच्या उपाययोजना आदींबाबत चर्चा अपेक्षित आहे. अशा संवादातूनच शिक्षण आणि कौशल्याच्या समन्वयातून स्वयंपूर्ण युवा पिढी घडविता येईल.
–जिल्हा माहिती कार्यालय, पुणे