सातार्‍यात गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद

स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड


स्थैर्य, 27 मार्च, सातारा : युद्धाच्यापरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅसटंचाईने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. अभ्यासासाठी परजिल्ह्यातून सातार्‍यात असलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण गावी जात आहेत. काही खाणावळ चालकांनी दर वाढविले, तर काहींनी खाणावळच बंद केल्याने विद्यार्थ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, शहरातील अभ्यासिका अक्षरशः ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

गॅसच्या टंचाईमुळे खाणावळी चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. याचा परिणाम म्हणून काही खाणावळींनी जेवणाचे दर वाढवले आहेत, तर काहींनीतात्पुरत्या खाणावळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उरलेल्या खाणावळी चालकांनी दर वाढविल्याने परवडणार्‍या दरात जेवण मिळणे कठीण झाले आहे.
दरम्यान, या परिस्थितीचा थेट परिणामपरीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. नियमित आहार आणि वेळेवर जेवण मिळत नसल्याने एकाग्रतेत अडथळे निर्माण होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या भोजन व्यवस्थेची सोय करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकूणच, गॅस टंचाईचा फटका केवळ घरगुती पातळीवरच नाही, तर शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

राज्यसेवेची मुख्य परीक्षा चार एप्रिलला आहे. परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. अभ्यास करण्याच्या कालावधीत खाणावळ बंद असल्याने बहुतांश विद्यार्थी गावी परतले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे, तसेच पुढील काही दिवसात गट ब आणि गट क या पदासाठीची जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परिस्थिती निवळून खाणावळ व इतर बाबी सुरळीत होणे आवश्यक आहे.
गॅसटंचाईमुळे अभ्यासिकेवर मोठा परिणाम झाला आहे.

बाहेरगावाहून आलेले अनेक विद्यार्थी केवळ जेवणाच्या अडचणीमुळे परत जात आहेत. अभ्यासासाठी शांत वातावरण आणि नियमित दिनक्रम गरजेचा असतो; पण सध्या विद्यार्थ्यांना मूलभूत गरजांनाच तोंड द्यावे लागत आहे. अभ्यासिकेत सरासरी 150 विद्यार्थी अभ्यास करत होती. मात्र, आता 20 ते 25 विद्यार्थी येत आहेत.- विकास ताटे-देशमुख;समन्वयक, स्पर्धा परीक्षा केंद्र,छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा.


Back to top button
Don`t copy text!