दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । संगमनेर । कोरोना संकटात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावणार्या राज्यातील सर्व रुग्णवाहिका हया आरोग्य विभाग आणि रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा या रुग्णवाहिका मधेच बंद पडतात आणि त्यामुळे रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे अवघड होते. त्यामुळे अत्यंत गरजेच्या व अत्यावश्यक असलेल्या राज्यातील सर्व रुग्णवाहिकांची फिटनेस तपासणी आरटीओ विभागाकडून करून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी सरकारकडे केली आहे. या मागणीला परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.
परिवहन राज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांना दिलेल्या पत्रात सत्यजीत तांबे यांनी ही मागणी केली आहे. रुग्णवाहिका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत तातडीच्या काळात यांचा उपयोग होत असतो. बर्याचदा एखादा गंभीर रुग्ण वेळेवर दवाखान्यात पोहोचणे हा अक्षरशा त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. त्यामुळे रुग्णवाहिका सुस्थितीत असल्या तरच अशा रुग्णांचे जीव वाचतील. म्हणून त्या सर्वांची नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. कोरोना काळात या तपासणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहीकांची तात्काळ तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा सोलापूर सारखे अनेक ठिकाणी गंभीर प्रकार घडतील.
यासाठी सरकारने खबरदारी घेऊन आरटीओ विभागाला तातडीने फिटनेस तपासणी करण्याच्या सूचना देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर परिवहन राज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांनी आरटीओ भागाला तात्काळ सूचना केली असून सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सर्व रुग्णवाहिकांची आरटीओ विभागाकडून फिटनेस तपासणी होणार आहे.