विंगच्या शिवारात लोंबकळताहेत प्रवाहित वाहिन्या


 

स्थैर्य, कराड, दि. ३० :शिवारात लोंबकळणार्‍या प्रवाहित वीज वाहिन्यांचा प्रश्‍न कराड तालुक्यातील विंगसह परिसरात ऐरणीवर आला आहे. प्रवाहित वाहिन्यांचा शिवारातील उसाला स्पर्श होऊन त्यांचे शेंडे करपले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुर्घटनेची टांगती तलवार आहे. या धोकादायक स्थितीबाबत वीज कंपनीला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकर्‍यांतून उमटत आहे.

विंगसह परिसरात शेतीपंपांना व घरगुती वीज पुरवठ्यासाठी वीज कंपनीने मोठे जाळे उभारले आहे. हजारच्या जवळपास शेतीपंपांची कनेक्शन, तर 3 हजारांवर घरगुती वीज कनेक्शन आहेत. शेतातील बांधावरून वीज खांबासह प्रवाहित वीजवाहिन्या ठिकठिकाणी नेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवारात त्यांचे जाळेच तयार झाले आहे. सध्या ठिकठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खांब झुकले आहेत. वाहिन्यातील ताण कमी होऊन त्या लोंबकळत आहेत. येथील सुतारकी वस्ती परिसरात दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. येथील बाळासाहेब माने यांच्या शेतात तर वाहिन्या लोंबकळत आहेत. त्यांचा उसाला स्पर्श होऊन घर्षणाने ऊस करपला आहे.

 

चचेगाव परिसरातील शेतीपंपांना करण्यात आलेला वीज पुरवठाही तेथूनच गेल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी भीतीपोटी आम्ही तिकडे जात नाही आणि खबरदारी म्हणून कुणाला जावूही देत नाही, असे शेतकरी माने यांनी सांगितले. त्याबाबत वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांना सांगितले. मात्र, त्यावर त्यांनी अद्यापही कार्यवाही केलेली नाही. परिणामी चार महिन्यांपासून अशीच स्थिती तेथे आहे.

विंगसह परिसरातील अनेक शिवारातील प्रवाहित वीजवाहिन्या अनेक ठिकाणी पिकांपर्यंत खाली आल्या आहेत. काही ठिकाणी त्या उसाला टेकल्या आहेत तर काही ठिकाणी झाडांनाही स्पर्श करत आहेत. ऊस आणि झाडे ओली असल्याने त्यातून लगेच प्रवाह उतरतो. जोराचा वारा आल्यावर तेथे स्पार्किंगच्याही घटना घडतात. वीज कंपनीने दुर्घटनेआधी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी  होत आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!