दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२४ | रायगड |
रायगड जिल्हयात दोन दिवसांत धुवाँधार झालेल्या पावसामुळे हाहाकार उडाला आहे. महाड, रोहा, नागोठणे, पाली, कर्जतला महापूराची स्थिती आहे. जिल्हयातील सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची तर पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. महाड, रोहा, नागोठणे शहरासह अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठिकठिकाणी घरे, शाळा इमारती, वाहने यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
रायगड जिल्हयात गेल्या चोवीस तासापासून धुवाँधार पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस कर्जतमध्ेय (२३१ मिमी) नोंदविण्यात आला आहे. सुधागड, पोलादपूर, पेण, खालापूर, अलिबाग, महाड, उरण, रोहा या तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला आहे. जिल्हातील अनेक ठिकाणी पुरामुळे नैसर्गिक आपत्तीची स्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील बोरघर येथील १ व्यक्ती वाहून गेली असून सदर मृतदेह रामराज नदीला दापोल खाडी येथे सापडून आला आहे. मृत व्यक्तीचे कमलाकर धर्मा म्हात्रे असे आहे.
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पुलाला पाणी लागले असल्याने सदर पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागोठणेला पुराचा वेढा पडला आहे. नागरीकांना स्थलांतरीत करणेचे काम चालू आहे. नागोठणे ते वरवठणे पूल पाण्याखाली गेला आहे. नागोठणे बस स्टॅड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा परिसरात पाणी भरले असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. माणगाव- तळा तालुक्यातही घर आणि इमारतींची नुकसानी आहे. ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. महाड तालुक्यातही काही भागात पूरस्थिती आहे. दस्तुरी नाका ते नातेखिंड रोडवर पाणी भरले आहे. कसबे शिवथर कडून सह्याद्री वाडीकडे जाणारा पूल तुटला आहे. पाचाड येथे भूस्खलन झाले आहे. दादली पुल हा जड वाहनाकरिता बंद केला आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पोलादपूर तालुक्यातही घरांची मोठ्या प्रमाणात पडझड व विजेचे पोल पडले आहेत. म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात शाळा इमारती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या माहितीप्रमाणे जिल्हयातील प्रमुख रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. पुरग्रस्त भागातील नागरीकांना स्थलांतरीत करणेचे काम चालू आहे. सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे.