स्थैर्य, पुणे, दि. १६ : मुदत ठेव ठेवलेली रक्कम परत न देणे डीएसके आणि डी.एस.कुलकर्णी अँड ब्रदर्स कंपनीला महागात पडले आहे. ग्राहकाने तीन वर्षांसाठी 30 मे 2014 रोजी 12 सप्टेंबर 2014 रोजी ठेवलेले प्रत्येकी तीन लाख रुपये 12 टक्के वार्षिक व्याजाने परत देण्याचा आदेश अध्यक्ष जे.व्ही.देशमुख, सदस्य अनिल जवळेकर आणि शुभांगी दुनाखे यांनी दिला आहे.
तक्रारदारांना व्याजासह दोन्ही ठेवीचे मिळून 8 लाख 55 हजार 480 रुपये मिळणार आहे. याबरोबरच नुकसान भरपाईपोटी 10 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 5 हजार रुपये देण्यात यावेत. 45 दिवसात रक्कम न दिल्यास सहा लाखांवर वार्षिक 15 टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याचेही आयोगाने आदेशात म्हटले आहे.
वरद सुशिल पटवर्धन (रा. सदशिव पेठ) यांनी ऍड. श्रीराम करंदीकर याच्यामार्फत डी.एस.कुलकर्णी अँड ब्रदर्स कंपनी आणि डीएसके यांच्याविरोधात 30 जून 2018 रोजी तक्रार दाखल केली होती. जाबदेणार कंपनी नोंदणीकृत आहे. त्या उच्च व्याजदरावर ठेवी स्विकारतात.
तक्रारदारांनी 30 मे 2014 आणि 12 सप्टेंबर 2014 रोजी 12 टक्के व्याजाने प्रत्येकी 3 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. तक्रारदारांना दोन्ही ठेवींचे प्रत्येकी 4 लाख 27 हजार 740 रुपये मिळणार होते. जी रक्कम एकुण 8 लाख 55 हजार 480 रुपये होती.
मुदत ठेव गुंतविलेल्या रक्कमेवरील व्याजाचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, तो नंतर तक्रारदारांकडून परत घेण्यात आला. मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी रक्कम परत मागितली. मात्र, देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली. 18 वार्षिक व्याजाने 8 लाख 55 हजार 480 रुपये, नुकसान भरपाईपोटी 5 लाख आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 10 हजार रुपयांची मागणी केली. जाबदार कंपन्यानी आयोगासमोर म्हणणे मंडले नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या बाजूच्या युक्तीवादानंतर निकाल देण्यात आला.