नांदलच्या ५ ‘वाघां’नी शब्द पाळला; भारतीय सैन्यात दणक्यात निवड! यात्रेच्या बॅनरवर दिलेल्या ‘त्या’ एका आव्हानाने बदलले नशीब…


फलटण तालुक्यातील नांदल गावातील पाच तरुणांची भारतीय लष्करात निवड. गावच्या यात्रेत बॅनर लावताना त्यांना दिलेल्या आव्हानाचे त्यांनी सोनं केलं. सुदिप, प्रेम, शुभम, प्रतिक आणि इरफान यांच्या यशाची प्रेरणादायी कहाणी. वाचा सविस्तर…

स्थैर्य, फलटण, दि. १४ जानेवारी : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुले काय करू शकतात, याचे उत्तम उदाहरण फलटण तालुक्यातील नांदल गावाने समोर ठेवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन आर्मी भरती निकालामध्ये (Indian Army Recruitment Result) नांदल (ता. फलटण) येथील एकाच वेळी पाच तरुणांची भारतीय सैन्यात निवड झाली आहे. या सुपुत्रांच्या यशामुळे संपूर्ण नांदल गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

देशसेवेसाठी सज्ज झालेले ‘ते’ पाच वीर भारतीय सैन्यात निवड झालेल्यांमध्ये सुदिप सतिश सरक, प्रेम आण्णा कोळेकर, शुभम दादा कोळेकर, प्रतिक सुरेश कारंडे आणि इरफान शब्बीर पठाण या पाच जिगरबाज तरुणांचा समावेश आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी हे उत्तुंग यश संपादन केले आहे.

प्रेरणादायी किस्सा: “पुढच्या वर्षी तुमचा फोटो बॅनरवर हवा…”

या यशामागे एक अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी घटना कारणीभूत ठरली आहे. नांदल गावच्या वार्षिक यात्रेच्या काळात ‘श्री भैरवनाथ बहुउद्देशीय आजी माजी सैनिक संस्था फौजी ग्रुप, नांदल’ यांच्या वतीने गावातील सैनिकांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. योगायोगाने हे पाचही तरुण त्यावेळी त्या बॅनरसाठी आणि सजावटीसाठी मदत करत होते.

तेव्हा फौजी ग्रुपच्या सदस्यांनी आणि मान्यवरांनी या मुलांना एक आव्हान दिले होते. त्यांना सांगण्यात आले की, “आत्ता तुम्ही बॅनर लावायला मदत करत आहात, पण पुढच्या वर्षी तुमचा स्वतःचा फोटो या फौजी ग्रुपच्या बॅनरवर लागला पाहिजे.”

हे शब्द या तरुणांच्या जिव्हारी लागले आणि त्यांनी ते आव्हान म्हणून स्वीकारले. त्या शब्दांनी प्रेरित होऊन या पाचही जणांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मैदानी आणि लेखी परीक्षेची तयारी केली. दिवसरात्र एक करून त्यांनी हे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरवले आहे. त्यांनी दिलेला शब्द आज खरा करून दाखवला आहे.

गावातून अभिनंदनाचा वर्षाव

या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण नांदल गावाला अभिमान वाटत आहे. श्री भैरवनाथ बहुउद्देशीय आजी माजी सैनिक संस्था फौजी ग्रुप, नांदल यांच्या वतीने या सर्व नवनिर्वाचित जवानांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच श्री भैरवनाथ महाराज यांच्या चरणी या जवानांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. भावी पिढीसाठी या तरुणांनी एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


Back to top button
Don`t copy text!