स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१ : कोरोनाव्हायरसने आपलं रूप बदललं असून या नव्या विषाणूचा पहिला अवतार ब्रिटनमध्ये उघड झाला. तो विषाणू आता तिथून आलेल्या प्रवाशांबरोबर भारतातही पसरत आहे. काल या नव्या कोरोनाचे 20 रुग्ण सापडले आज त्यात आणखी 5 ची भर पडल्याने चिंता वाढली आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने त्यांच्याकडे आलेल्या सँपल्सपैकी 4 रुग्णांमध्ये नवीन विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. तर पाचवी केस दिल्लीच्या IGIB ने कन्फर्म केली आहे.
ब्रिटनमध्ये SARS-CoV-2 चा जो नवा स्ट्रेन दिसून आला आहे, तो अधिक संसर्गजन्य आहे. पण कोरोनाव्हायरसमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. पण नव्या विषाणूमुळे नेमका काय परिणाम होतो हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
ब्रिटनमधून आलेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या प्रत्येक प्रवाशाची विशेष तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्रीय आरोग्य मंत्रालय करते आहे. आरोग्य मंत्रालयानं मागच्या काही काळात ब्रिटनमधून भारतात आलेल्या लोकांसाठी विशेष आदेश काढले आहेत. 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2020 या काळात भारतात आलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी जर कोरोनाच्या लक्षणांनी ग्रस्त असतील आणि त्यांची चाचणी पॉजिटिव्ह आली असेल, तर त्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे.
नव्या वर्षात कोरोना लशीची प्रतीक्षा होती. पण आता नव्या कोरोनाव्हायरसमुळे तो उत्साहही कमी झाला आहे. ही लस नव्या कोरोनावर प्रभावी ठरेल की नाही असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. मात्र ब्रिटनमधील या कोरोनाला भारतीय लस टक्कर देणार आहे, असा मोठा दिलासा भारत बायोटेकनं दिला आहे.
व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमध्ये 17 बदल झाले आहेत. त्यापैकी 8 बदल खूप महत्त्वाचे आहेत. व्हायरसचा ज्या रिसेप्टरनं मानवी पेशीशी सोडला जातो तो नव्या कोरोनामध्ये अधिक मजबूत आहे, ज्यामुळे तो सहजरित्या संक्रमित होतो. संक्रमणाचा दर हा 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा व्हायरस इतक्या वेगानं पसरतो आहे.