
दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । सातारा । ग्रामीण भागामध्ये पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी होण्याच्या उद्देशाने गावात प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशन हाती घेतले आहे. या मिशन अंतर्गत जिह्यात 237 गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू झाली आहेत. सुमारे पाच लाख 77 हजार 43 कुंटुंबाना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात, तर शहर भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहे. जिह्यात 5 लाख 77 हजार 43 कुटुंबे असून आतापर्यंत सुमारे 4 लाख 59 हजार 551 कुटुंबाना नळ कनेक्शन दिली आहेत. जलजीवन मिशनमध्ये सातारा जिह्याने नेहमीच आघाडी घेतली आहे. 175 योजनांना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकाऱयामार्फत निधीही वितरीत केला आहे. जिह्यातील दुर्गम व डोंगरी भागातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायत विविध पातळीवर योजनाही निधी मिळाल्यामुळे त्या उर्जितावस्थेत येणार आहेत. जिह्यात सुमारे 21 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असून, सुमारे 21 कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली दर आवडय़ाला पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱयांची तालुकानिहाय बैठका घेवून योजनानिहाय सविस्तर आढावा घेण्यात येत असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे यांनी सांगितले.