स्थैर्य, म्हसवड, दि. २४: ‘कोरोना महामारीच्या काळात म्हसवड व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांवर ऑक्सिजन सिलिंडरअभावी कठीण प्रसंग येऊ नये, यासाठी लोकसहभागातून उभारलेल्या म्हसवड कोविड हॉस्पिटलसाठी देसाई उद्योग समुहातर्फे पाच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले आहेत,’ अशी माहिती सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी दिली.
कोरोना संसर्गामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली असून, ऑक्सिजनअभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. म्हसवड परिसरात कोणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून व कोविड रुग्णांना गावातच आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ‘आम्ही म्हसवडकर’ ग्रुपने लोकसहभागातून शहरातच म्हसवड कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलच्या मदतीसाठी देसाई उद्योग समूह, सातारा यांनी मदतीचा हात पुढे करून पाच जम्बो ऑक्सिजन सिलिंडर दिले आहेत.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, पं. स. सदस्य तानाजी काटकर, जालिंदर खरात, आम्ही म्हसवडकर ग्रुपचे युवराज सूर्यवंशी, राहुल मंगरुळे, कैलास भोरे, डॉ. राजेंद्र मोडासे, डॉ. राजेश शहा, अॅड. अभिजित केसकर, प्रशांत दोशी, गणेश माने, समीर ओंबासे, अविनाश मासाळ, भागवत जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अनिल देसाई म्हणाले, ‘शहरी व ग्रामीण भागातील जनतेने स्वतःची घ्यावी. स्वतःची काळजी घ्या म्हणजे समाजाचीही काळजी घ्याल. हा आजार निदर्शनास आल्यास आरोग्य विभागाशी त्वरित संपर्क साधा. कोणीही आजार लपवू नये, योग्य उपचाराने हा आजार बरा होतो. ग्रामीण भागातील जनतेचे योग्य उपचार व सोयी सुविधाअभावी हकनाक बळी जावू नयेत, म्हणून ‘देसाई उद्योग समूहा’कडून ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात आली आहे.
या वेळी ‘आम्ही म्हसवडकर’ ग्रुपचे सदस्य, ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आम्ही म्हसवडकर ग्रुपने ‘देसाई उद्योग समूहा’ने मदत केल्याबद्दल धन्यवाद दिले.