गांजा लागवड प्रकरणी परदेशी नागरिकांशी पाच दिवस कोठडी, सहकार्य करणारे चौकशी साठी ताब्यात


स्थैर्य, सातारा, दि.१८: गांजा लागवड प्रकरणी परदेशी  नागरिकांची न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही स्थानिकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे याबाबत कसून चौकशी सुरू आहे . दरम्यान या परदेशी युवकांच्या संपर्कातील काही जण परागंदा झाले आहेत.

सोमवारी रात्री नंदनवन पार्क सोसायटीतील एका रो हाऊस वर छापा टाकून पोलिसांनी दोन परदेशी युवकांना  पारपत्र व रहिवास परवाना नसल्याप्रकरणी  ताब्यात घेतले. यावेळी घराची झडती घेत असताना घरामध्ये गांजा सदृश्य वनस्पतीची लागवड केल्याचे आढळून आले.  या बाबत खात्री करण्यासाठी पोलिसांनी पुण्याहून न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ञांना बोलावलेले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली.त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवार दि २०फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांना चौकशीमध्ये परदेशी युवक कोणतेही सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. ही गांजा सदृश्य वनस्पती नसून औषधी वनस्पती असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. या परदेशी नागरिकांना  घर उपलब्ध करून देणारे व त्यांच्या संपर्कात असणाऱ्या काही स्थानिकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर पोलिस चौकशीसाठी बोलावतील व अटक करतील या भीतीने अनेक जण परागंदा झाल्याची माहिती मिळत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अनिदराव खोबरे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!