
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सातारा । मोळाचा ओढा ते महानुभाव मठ यादरम्यान अतिक्रमण करणाऱ्या दुकानांपैकी पाच दुकाने सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाने शुक्रवारी सील केले . संबंधित व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कडे धाव घेऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी त्यांचे म्हणणे लेखी सादर करा असा स्पष्ट आदेश दिल्याने व्यापाऱ्यांना रिकाम्या हातीच माघारी परतावे लागले ही मोहीम सुमारे यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आम आदमी पार्टीचे खजिनदार व सामाजिक कार्यकर्ते सागर भोगावकर यांनी मोळाचा ओढा ते महानुभाव मठ या दरम्यान तब्बल 20 पेक्षा अधिक दुकानांचे अतिक्रमण झाले असून ही अतिक्रमणे तातडीने काढली न केल्यास 15 ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता तसेच हा अर्ज लोकशाही दिनामध्ये सुद्धा दाखल करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे सातारा नगरपालिकेने तातडीने या अर्जावर कारवाई सुरू केली . मोळाचा ओढा ते महानुभाव मठ हा परिसर सातारा शहराच्या हद्दीत आल्यामुळे जुन्या महामार्ग लगतच्या मोकळ्या जागा आणि तेथील अतिक्रमणे हा विषय ऐरणीवर आला आहे . सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाने सुद्धा त्यांना यापूर्वीच 52 53 च्या नोटिसा बजावल्या होत्या मात्र हद्दवाढीच्या प्रक्रियेत ही कारवाई काही काळ मागे पडली होती.
शुक्रवारी अतिक्रमण हटाव विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम सात ते आठ कर्मचारी शहर विकास विभागाच्या सूचनेप्रमाणे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले आणि मोळाचा ओढा परिसरातील पाच गाळे सील करण्यात आले . मात्र तोंडे बघून ही कारवाई झाल्याचा आरोप सागर भोगावकर यांनी केला आहे या प्रक्रियेतील बडी धेंडे अजूनही बाजूलाच राहिले असून या कारवाईने आपले समाधान झाले नसल्याचा आरोप भोगावकर यांनी केला . कारवाई दरम्यान व्यापाऱ्यांची एकच पळापळ झाली शाहूपुरी परिसरातील माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्यासह व्यापारी तत्काळ नगरपालिकेत दाखल झाले त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेतली मात्र मुख्याधिकार्यांनी जे काही म्हणणे असेल ते लेखी द्या असे स्पष्ट बजावल्याने व्यापारी आल्या पावली माघारी परत गेले ही कारवाई पुढेही सुरू राहणार आहे यामध्ये कोणालाही सूट दिली आहे असा कोणीही समज करून घेऊ नये जे अतिक्रमण आहे ते तात्काळ काढले जाईल कारवाईमध्ये दुजाभाव होणार नाही असे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी स्पष्ट केले आहे.