पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईचे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२६: राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. हा कायदा येईपर्यंत अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली. पर्ससीन नेटविरुद्ध पारंपरिक मच्छिमारांचे सुरू असलेले उपोषण संपविण्याचे आवाहनही श्री. शेख यांनी यावेळी केले.

दापोली, मंडणगड, गुहागर मच्छिमार संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने श्री. शेख यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह शिष्टमंडळातील बाळकृष्ण पावसे, प्रकाश रघुवीर, गोपीचंद चौगले, विष्णू ताबीब, सोमनाथ पावसे, गणेश घोगले, हरेश्वर कुलाबकर, यशवंत खोपटकर आदी उपस्थित होते. श्री. शेख म्हणाले की, राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य शासन कडक कायदा करत आहे. येत्या काही काळातच हा कायदा लागू होईल. या कायद्यामध्ये अवैध पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणे तसेच हायस्पिड बोटींचा वापर करून मासेमारी करणे आदींविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची तरतूद केली आहे. यामुळे अशा अवैध मासेमारींना आळा बसेल. तोपर्यंत सध्या अशा बोटींविरुद्ध कडक कारवाई करावी. या कारवाईसाठी विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पीड बोट देण्यात येईल. तसेच अवैध मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी कोस्ट गार्डसह पोलीस व महसूल यंत्रणाबरोबर बैठक घेण्यात येईल.

मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. पाटणे म्हणाले, अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई सुरू आहे. तसेच इतर राज्यातून आलेल्या बोटींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांशी चर्चा झाली असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच यासाठी अंमलबजावणी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
कोकण किनारपट्टीवर तीन लँडिंग पॉईंट उभारणार – अस्लम शेख

आमदार रमेश पाटील व चेतन पाटील यांच्या शिष्टमंडळानेही यावेळी श्री. शेख यांची भेट घेतली. अवैध मासेमारी विरुद्ध कारवाई करणे, सागरी किनाऱ्यावर जेट्टी, मासे उतरविण्यासाठी जागा उभारण्याची त्यांनी मागणी केली.

त्यावर श्री. शेख म्हणाले की, सागरी किनाऱ्यावरील जेट्टी, मासे उतरविण्याच्या जागा विकसित करणे, शीतगृह (कोल्ड स्टोअरेज) उभारणे आदी कामे सुरू करण्यात येत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात ही कामे वेगाने पूर्ण होतील. तसेच कोकण किनारपट्टीवर येत्या काही काळात तीन मोठे लँडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. तसेच समुद्र किनाऱ्यावरील गाळ काढण्यासाठी विशेष तरतूद करण्याचे निर्देशही श्री. शेख यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!