दैनिक स्थैर्य । दि. ०३ सप्टेंबर २०२२ । फलटण । स्मार्ट प्रकल्प अंतर्गत राज्यातील 305 बाजार समित्यांची सन 2021 – 22 या वर्षाची क्रमवारी यादी पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्ध केलेली असून यामध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा कोल्हापूर पणन विभागामध्ये दुसरा तर सातारा जिल्ह्यात पहिला क्रमांक आलेला आहे. तर राज्यामध्ये 38 वा तर सांगली बाजार समिती नंतर विभागात दुसरे स्थान मिळाले आहे.
विशेष म्हणजे स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत गुणांकन करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा निकष, आर्थिक कामकाज निकष, वैधानिक कामकाज निकष, इतर निकष विचारात घेऊनच सहकार व पणन विभागाकडून स्वतंत्ररीत्या मूल्यांकन करुन राज्यस्तरीय व विभागस्तरीय रँकिंग जाहीर करण्यात आली आहेत.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती ही, गेली अनेक वर्ष महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदशनाखाली काम करणारी बाजार समिती आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कल्पकतेने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना त्यांचे सहकारी सर्व संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व सर्व कामगार वर्ग यांना सोबत घेत शेतकरी, कष्टकरी यांचे हितास्तव काही धाडसी व विधायक धोरणात्मक निर्णय घेतले.
सदर निर्णयाची अंमलबजावणी बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर आणि त्यांचे सहकारी सर्व स्टाफ योग्य समन्वय व बेस्ट टीम वर्कचे माध्यमातून यशस्वीरित्या करत आहेत.
फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे सर्व शेतकरी, अडते, खरेदीदार व्यापारी, हमाल, मापाडी, वाहनचालक व इतर घटक, बाजार समितीचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, भगवानराव होळकर व सहकारी सर्व संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी वृंद यांचे उचित समन्वयातून बाजार समितीच्या विकासाचा आलेख चढता राहिलेला दिसून येतो.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या यशस्वी कामगिरीबद्दल बाजार समितीचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव शंकरराव सोनवलकर व सर्व संचालक व कामगार वर्ग यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.