स्थैर्य, सातारा, दि. 18 : पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण या केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने घोषणा केलेल्या पुरस्कारासाठी राज्यात सातारा जिल्हा परिषदेची निवड झाली आहे .आता सातारा जिल्ह्याला 50 लाख रुपयांचा हा पुरस्कार मिळणार आहे. जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव व माण तालुक्यातील इंजबाव या दोन ग्रामपंचायतींनी सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये राज्य स्तरावरील उत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या यादीत स्थान पटकावले आहे .या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी आठ लाख रुपये इतकी पुरस्काराची रक्कम मिळणार आहे .
या पुरस्काराबाबत बोलताना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत म्हणाले की ,पुरस्कारासाठी सातारा जिल्हा परिषदेची झालेली निवड अभिमानास्पद आहे तसेच या दोन्ही ग्रामपंचायतीने आपल्या कार्याचा झेंडा अटकेपार फडकवला आहे .जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून यश आहे या पुरस्कारासाठी केंद्र शासनाने 100 गुणांची प्रश्नावली निश्चित केली होती .यामध्ये स्वच्छता नागरी सुविधा नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन इ गव्हर्नन्स आदी क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचे स्वयम् मूल्यांकन करण्यात आले. ही प्रश्नावली जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर शासनाला ऑनलाइन पाठविण्यात आली होती .त्यानंतर विभागीय आयुक्त स्तरावरून नेमण्यात आलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पथकामार्फत मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात तपासणी केली होती .या पथकाने केलेल्या मूल्यांकनानुसार राज्य शासनाने केंद्र शासनास केलेल्या शिफारशी मधून महाराष्ट्रातून सातारा झेडपी ची निवड करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत ,शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ ,महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ .सोनाली पोळ ,समाज कल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.