दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । फलटण । शहराच्या हद्दीमधील सर्व प्रभागामध्ये स्वतंत्र यंत्रणा राबवून फलटण शहरात महास्वछता अभियान नुकतेच राबिविले असल्याची माहिती नगरपालिकेचे नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांनी दिली.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शखाली फलटण शहरात स्वछता मोहिमेचा पहिला टप्पा नुकताच संपन्न झाला. यामध्ये फलटण शहरात असणारे ओपन स्पेस सह खाजगी मोकळ्या जागेची सुद्धा साफसफाई करण्यात आली. दि. ०२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली असून रात्री उशिरा पर्यंत स्वच्छता अभियान सुरु असल्याची माहिती यावेळी नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यामध्ये शहराच्या १२ प्रभागात १२ सचिवांची नियुक्ती करून त्यांच्या अखत्यारीत ३ क्लार्क यांची नियुक्ती करण्यात आली होती तर प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र असे जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती. पुढच्या होणाऱ्या स्वछता अभियानात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य असणे गरजेचे आहे असेही नगरअभियंता पंढरीनाथ साठे यांनी स्पष्ट केले.