
स्थैर्य, फलटण, दि. ७ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले झाल्याने, या पदासाठी राजे गटाने उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवार म्हणून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी कार्यकर्ते फिरोज बागवान यांनी केली आहे.
अनिकेतराजे यांच्या उमेदवारीसाठी राजे गटातील बहुसंख्य कार्यकर्ते आग्रही असून, त्यांच्या नावाला जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे बागवान यांनी म्हटले आहे. बागवान पुढे म्हणाले की, “श्रीमंत अनिकेतराजे यांनी सिम्बायोसिस महाविद्यालयातून एल.एल.बी. पदवी घेतली असून, त्यांना मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षांहून अधिक काळ वकिलीचा अनुभव आहे. त्यांचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळे ते अत्यंत लोकप्रिय आहेत.”
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीस वर्षांपासून नगरपरिषदेवर असलेले विकासाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी अनिकेतराजे यांच्यासारख्या सक्षम उमेदवाराची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. सध्या सोशल मीडियावरही कार्यकर्ते “फिक्स नगराध्यक्ष” म्हणून अनिकेतराजे यांच्या नावाने प्रचार करत असून, त्यांच्या नावाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.