अखेर निविदा प्रसिद्ध; फलटण – बारामती रेल्वेच्या कामाला गती : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२३ | फलटण |
स्वातंत्र्य मिळाल्यापासून रखडलेला फलटण-बारामती रेल्वेचा प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी भूमिका घेऊन तो पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यामध्ये कै. माजी खासदार हिंदूरावजी नाईक निंबाळकर व अन्य नेते होते. त्यांच्याबरोबरच जनतेचे रेल्वेचे हे स्वप्न पूर्ण करताना मला आज आनंद होत आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या फलटण ते बारामती या रेल्वेच्या जमीन अधिग्रहणानंतर रेल्वे लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून मी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. त्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ६०० कोटी रुपये मंजूर करून दिले व त्याची निविदा कालच प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आता या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

गेल्या महिन्यामध्ये रेल्वेचे ब्रिज तयार करण्याची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्याचे काम प्रत्यक्षामध्ये सुरू झाले. यानंतर आता रेल्वे लाईन टाकण्याचं काम प्रत्यक्षात आता सुरू होईल. लोणंद – फलटण रेल्वे सुरू आहे, आता बारामतीकडे रेल्वे सुरू झाल्यानंतर फलटणकरांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खूप मोठे सहकार्य याकामी लाभलेले आहे.

या रेल्वे प्रकल्पामध्ये फलटण तालुका हे रेल्वेचे मुख्य ठिकाण होणार आहे. या ठिकाणी अमृत स्टेशन योजना मंजूर झालेली आहे. त्यामुळे या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणेकडून जाणार्‍या सर्व रेल्वे फलटणमार्गे दिल्लीला जाणार, त्यामुळे जनतेचा आर्थिक विकास होणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरवर्ग, सर्वसामान्य प्रवासी या सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. फलटण हे देशाच्या नकाशावर दळणवळणाचे मोठे साधन म्हणून दिसणार आहे. फलटणवरून मुंबई, पुण्याला नोकरीसाठी, शिक्षण, व्यवसायासाठी, शेतकर्‍यांना माल पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. जनतेने दिलेल्या प्रेमातून उतराई होण्यासाठी जेवढं या मतदारसंघासाठी काम करता येईल तेवढे काम मी करणार आहे, असे आश्वासन खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!