
दैनिक स्थैर्य । 6 जून 2025। फलटण । दि यशवंत को – ऑप. बँक लि., फलटण, जि. सातारा या बँकेवर दि. 29 मे 2025 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया (आर.बी.आय.) ने निर्बंध जारी केले आहेत, तथापि बँकेच्या सर्व ठेवीदारांना डी.आय.सी.जी.सी. द्वारा एकूण ठेवी पैकी 5 लाख रुपये पर्यंतच्या ठेव रकमेस विमा संरक्षण उपलब्ध असून सदरची रक्कम ठेवीदारांना मिळणार असल्याचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) जे. पी. शिंदे यांनी कळविले आहे.
ठेवीदारांनी डी.आय.सी. जी.सी. ने विहीत नमुन्यात जारी केलेले विलींगनेस (क्लेम फॉर्म) बँकेकडे देणे बंधनकारक आहे. हे क्लेम फॉर्म बँकेचे फलटण, कराड व सातारा या शाखामध्ये उपलब्ध आहेत. ठेवीदारांनी शुक्रवार (दि. 6) जून ते मंगळवार (दि. 10) जुलै 2025 पर्यंत केवायसी व आवश्यक त्या माहितीसह संबंधीत शाखेमध्ये क्लेम फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.
बँकेच्या फलटण, कराड व सातारा शाखांमध्ये शुक्रवार (दि. 6) जून ते मंगळवार (दि. 10) जुलै 2025 दरम्यान सुट्टीचे दिवशी देखील सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या वेळेत क्लेम फॉर्म स्विकारले जातील. सर्व ठेवीदारांना त्यांचा क्लेम लवकर मिळावा यासाठी बँक प्रयत्नशील आहे. त्यामुळे क्लेम फॉर्म बिनचूक भरुन संबंधीत शाखेकडे उपरोक्त तारखेच्या आत दाखल करावेत. बँकेने दिलेल्या वरील मुदतीनंतर आलेल्या क्लेम फॉर्म बाबतची संपूर्ण जबाबदारी ही त्या संबंधीत ठेवीदारांची असेल याची कृपया नोंद सर्व ठेवीदारांनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बँकेच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासक तथा सहाय्यक निबंधक जे. पी. शिंदे यांनी केले आहे.