
स्थैर्य, फलटण, दि. १६ सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात, पशुसंवर्धन विभागातील ‘पशुधन पर्यवेक्षक वर्ग ३’ ची ३४०० रिक्त पदे तात्काळ भरण्याची आणि ‘एलएमडीपी’ डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांची शासनामार्फत नोंदणी करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश सरचिटणीस राहुल महामुनी यांनी हे निवेदन सादर केले असून, यावर हजारो विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, “मागील अनेक वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती झालेली नाही. मनुष्यबळ कमी असल्याने एका कर्मचाऱ्याला २०-२० गावे सांभाळावी लागत आहेत, ज्यामुळे लसीकरण वेळेवर होत नाही आणि लम्पीसारख्या आजारांमुळे जनावरे दगावत आहेत. विभागाचा भरतीसाठीचा आकृतीबंध तयार असून, केवळ आपल्या आदेशाची प्रतीक्षा आहे.”
“आमच्यासारखे हजारो विद्यार्थी गेल्या ७ वर्षांपासून या भरतीची तयारी करत असून, वयोमर्यादा वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे. आपण मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून, जिल्हा परिषद भरतीमध्ये पशुधन पर्यवेक्षक पदांचा समावेश करावा आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा,” अशी कळकळीची विनंतीही विद्यार्थ्यांनी केली आहे.