दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२३ | फलटण |
विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबद्दल हेतूपुरस्सर गैरसमज निर्माण करून त्यांची बदनामी करणार्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी फलटण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी फलटण तालुकाध्यक्षा सौ. रेश्मा भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी फलटणच्या उपविभागीय अधिकार्यांना दिले आहे.
राष्ट्रवादी महिला आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात सांगोला व कुर्डूवाडी येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांची बदनामी करत आहेत. तसेच सांगोला येथे त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच कुर्डूवाडी येथे त्यांच्या प्रतिमेला ‘जोडो मारो’ आंदोलन करण्यात आले. असे बदनामीकारक कृत्य करून समाजामध्ये अशांतता पसरविणार्या व कायदा-सुव्यवस्था बिघडविणार्या प्रवृत्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा आम्हालादेखील ‘जशास तसे’ उत्तर द्यावे लागेल व आमच्या कृत्यामुळे अशांतता पसरल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे म्हटले आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ. रेश्मा भोसले, सौ. स्वप्ना कोरडे, सौ. बोरकर, सौ. लतिका अनपट, सौ. राजश्री शिंदे, सौ. नूरजहाँ सय्यद, सौ. प्रतिभा चौधरी, सौ. रेखा माने, सौ. ऊर्मिला काटे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.