दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | सातारा | धोम प्रकल्पग्रस्त समितीचे स्वंयघोषित अध्यक्ष तुकाराम सणस यांनी शासनाची फसवणूक करून कोरेगाव तालुक्यातील आसरे गावात अतिरिक्त जमिन मिळवली आहे. तसेच बेकादाय जमिन विक्री केली आहे. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा आसरे येथील ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.
याबाबत आसरे गावातील ग्रामस्थांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आसरे, येथील धोम प्रकल्पग्रस्त समितीचे स्वयंघोषित अध्यक्ष तुकाराम सणस हे एका नामवंत संस्थेत ज्ञानदानाचे काम करतात. असे असूनही त्यांनी आपल्या पाताळयंत्री स्वभावाने गावातील लोकांना त्रास दिला असून गावचे गावपण हरवून टाकले आहे. त्यांच्या चिरंजीवाकरवी त्यांनी गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष पदाचा वापर करून शासनाची फसवणूक करत आपल्या कुटुंबासाठी प्रकल्पग्रस्त म्हणून जादा जमिन मिळवली. याप्रकरणी गावातील नगारिकांनी एकत्र येवून तुकाराम सणस व त्यांची आई कै. श्रीमती वेणुताई सणस यांनी शासनाची फसवणूक करून प्रकल्पग्रस्त म्हणून जादा जमिन बळकावल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता.
याबाबत सविस्तर चौकशी होवून तुकाराम सणस यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून जादाची जमिन व प्लॉट मिळवले असून त्या व्यतिरिक्त गावच्या नकाशात फेरफार करत गावठाण जागेत अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी 24 मार्च 2021 रोजी गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवून या अतिक्रमणाची नेांद रद्द करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच तुकाराम सणस यांनी नोंदणीकृत दस्ताने जागा विकलेले दस्तही रद्द करण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी सुनावणी होवून अप्पर जिल्हाधिकारी यांनी दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी वेणुताई सणस यांनी शासनाची फसवणूक करून मिळवलेली गोळेवाडी, ता. कोरेगाव येथील गट क्र. 125 पै. क्षेत्र 2.08 व मौजे आसरे कोरेगाव येथील भुखंड क्र. 86 रद्द करण्यात येत असल्याचा आदेश दिला. यामुळे आता याप्रकरणी तुकाराम सणस यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकावर रुपेश सपकाळ, रामचंद्र सणस, अनिल सणस, सिद्धार्थ चव्हाण, महेंद्र सणस, लक्ष्मण सणस, धर्मेंद्र सणस आदींच्या स्वाक्षरी आहेत.