स्थैर्य, कराड, दि. ०७ : कराड शहर हद्दीत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील सहाजणांना तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.
याबाबत माहिती अशी, प्रदुम्न / पदया दिपक सोळवंडे , वय -२५ वर्षे , टोळी सदस्य रोहीत रमेश कारंडे , वय -२३ वर्षे मनोज महादेव जाधव , वय -२३ वर्षे, विजय शिवाजी घारे , वय -३२ वर्षे, अमोल जगन्नाथ भोसले, वय -३४ वर्ष, सर्व रा. महात्मा फुले चौक बुधवार पेठ कराड , जि.सातारा. ओंकार युवराज थोरात वय -२४ वर्षे , रा. ओंड , ता.कराड, जि. सातारा. अशी टोळी तयार झाली होती. या टोळीचा कराड शहर व तालुक्यात उपद्रव वाढला होता. त्यामुळे या टोळीतील वरील सहाजणांना हद्दपार करण्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता. वरील टोळीने गर्दीमारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे असे गुन्हे केलेले आहेत. त्यांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती. हद्दपार प्रस्तावाची सुनावणी चालु असतानाही त्यांचेवर गुन्हे दाखल झाले होते. या गुंडांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती. त्यामुळे त्यांचेकडुन कराड तालुका हद्दीत हिंसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवु नये म्हणुन या टोळीतील वरील टोळीतील 6 जणांना हद्दपार करण्याचा आदेश तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. आदेशाची बजावणी झाल्यानंतर ४८ तासाचे आंत त्यांना कराड तालुका हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश केला आहे.