निसर्गाशी झुंज म्हणजे पृथ्वीचा नाश : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । राज्यासह देशांमधील विविध भागांमध्ये जागतिक तापमान वाढीचे अपरित परिणाम जाणवू लागले आहेत. त्याचा फटका आता फलटणला ही जाणू लागला आहे. आगामी काळामध्ये जागतिक तापमान वाढीवर कामकाज करणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये सर्वत्र काम करत असताना निसर्गाशी झुंज म्हणजेच पृथ्वीचा नाश हे वाक्य आता आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवावे लागणार आहे. निसर्गासोबत कोणतीही छेडछाड करून चालणार नाही, असे मत विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण येथील आयोजित एका कार्यक्रमांमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव श्री. उपासे, धोम बलकवडी विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता श्री. हिरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

आगामी काळामध्ये निसर्गाचे बदललेले स्वरूप पाहता हवामान बदलाशी मिळते जुळते घेऊनच आपल्याला पीक पाणी करावी लागणार आहे. नुसतं पाणी आणलं म्हणण्यापेक्षा स्वस्त व मुबलक पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये जागतिक तापमान वाढीवर काम करण्यासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य देणार असल्याची ग्वाही सुद्धा यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

कृष्णा खोऱ्यातील पाणी आपण निरा खोऱ्यामध्ये आणलं हे नुसतं पाणी मी आणलं म्हणण्यापेक्षा खरंतर मी एक कारखाना काढायला पाहिजे होता परंतु मी आणलेल्या पाण्यावर दुसऱ्याने कारखाना काढला आणि तो कारखाना कसा सुरू आहे ? हे काय फलटणकरांना वेगळ सांगायची गरज नाही, असा टोलाही या वेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला.

आपल्या निरा उजव्या कालव्याचे पाणी बारामतीला दिले असल्याबाबत काही विरोधक कायमच भाष्य करीत असतात. परंतु आपण आपल्या कॅनोलच्या पाण्याचा उपसा किती होतो ? व आपल्याला परवानगी किती आहे ?आपण त्याचे पाणी किती वापरतो, याची सत्यता पडताळून बघणे गरजेचे आहे व मगच त्यावर बोलणे गरजेचे आहे असेही यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

आपल्या राज्याचे पाणी आंध्र प्रदेश व कर्नाटकला गेले असते परंतु लवादाच्या माध्यमातून ते पाणी आपण महाराष्ट्राला पुन्हा ठेवले व त्यातूनच धोम बलकवडी या धरणाचे निर्मिती झाली. त्यावेळी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्या लवादासाठी जाणार होते. परंतु महाराष्ट्राच्या वतीने मला तेथे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी गुजरात मधील एका धरणाची उंची वाढवण्यासाठी विरोध केला व त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच मला केंद्रीय जलसंपदा खात्यांमधून फोन आला व तुम्हाला तुमच्या येथे कोणते धरण करायचे आहे ? याबाबत चौकशी केली व धोम बलकवडी धरण झाले. भारतीय जनता पार्टी मधील सर्व नेतेमंडळी स्वतःची पाठ थोपटून घेत असतात परंतु हे प्रकरण झाल्यानंतर पंतप्रधान व गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी पाठ थोपटलेली होती, असेही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले. आधुनिक भगीरथ या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केल्याबद्दल वरद आर्ट्चे महेश सुतार यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यासोबतच सन ग्राफिकचे उमेश निंबाळकर यांचा पुस्तकाच्या निर्मिती बाबत सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!