‘कोरोना’शी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि.29 : कोरोनाशी मुकाबला करीत रस्त्यांची कामेही गतीने पूर्ण  करावयाची आहेत. कामे रेंगाळली नाही पाहिजेत. भूसंपादनाची कामे प्रलंबित राहू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्ग व पालखी मार्ग संदर्भातील भूसंपादन आढावा आणि सोलापूर -कोल्हापूर रस्ते महामार्गावरील मिरज बाह्यवळण रस्त्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, राष्ट्रीय महामार्ग,राज्य रस्ते विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथील जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच अडचणी व लागणाऱ्या निधीबाबत चर्चा केली.

सातारा जिल्ह्यातील कराड-तासगांव रस्ता व पुलाचे काम लवकर करावे. सातारा-कोरेगांव-मसवड हा रस्ता महत्त्वाचा आहे. लोकांची सारखी मागणी असते,असे स्पष्ट करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले,कामासाठी येणाऱ्या कामगारांना परवानगी द्या.खंबाटकी घाटातील बोगद्याचेही काम त्वरित पूर्ण करावे.

सोलापूर शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे,असे त्यांनी  यावेळी सांगितले.

टेंभुर्णी-पंढरपूर -मंगळवेढा-उमदी-विजापूर आणि अक्कलकोट-नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यांच्या कामाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.माढा परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या,असे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील आढावा घेताना संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम लवकर व्हावे.भूसंपादनातील त्रुटी दूर करा,मिळालेला निधी खर्च करा,असे सांगितले.

नाशिक रोडवरील चाकण,राजगुरुनगर येथे वाहतूक कोंडी होते.तसेच वाघोली येथेही तिच परिस्थिती उद्भवते.तेव्हा तेथील रुंदीकरणाचे काम करावे,असे श्री.पवार यांनी सांगितले.पुणे ते शिक्रापूर रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

चारही बायपासचे काम सुरू असले तरी ते पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.चांदणी चौकातील रस्त्याचाही यावेळी आढावा घेण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!