कोळकीत ग्रामपंचायत निवडणूकीचा ‘फिव्हर’; मोर्चेबांधणीला वेग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, कोळकी दि.१९: कोरोनामुळे बर्‍याच दिवसांपासून रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांचा बिगुल नुकताच वाजला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया अवघ्या चार दिवसांवर आली असल्याने इच्छुकांसह गावपुढार्‍यांमध्ये निवडणूकीचा ‘फिव्हर’ चढायला सुरुवात झाली आहे. 

‘कोरोना’ मुळे ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मुदत संपलेल्या राज्यातील सर्व ग्रामपंचायतींप्रमाणे कोळकी ग्रामपंचायतीचादेखील कारभार गेले काही महिने प्रशासकांकडून सुरु होतो. त्यामुळे गावपुढार्‍यांची कुचंबना झाली होती. मात्र नुकताच निवडणूक आयोगाने राज्यातील मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर पुन्हा गावपुढार्‍यांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश भरल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जाणार आहेत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होणार असून नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

फलटण शहराला लागून असलेल्या व कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर विस्तारलेल्या कोळकी ग्रामपंचायतीवर पहिल्यापासून राजेगटाचे वर्चस्व आहे. मात्र फलटण तालुक्यात लोकसभा निवडणूकीनंतर भाजपच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाची देखील ताकद वाढली असल्याने या निवडणूकीत राजे गटाला खासदार गटाकडून तगडे आव्हान दिले जाण्याचे चिन्हा दिसत आहेत. कोळकीचे माजी सरपंच व गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत शिंदे या निवडणूकीत काय भूमिका घेणार? ते निवडणूक लढवणार कां? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. जुन्या नेतेमंडळींबरोबरच गावातील नवे नेते, युवा कार्यकर्ते देखील कामाला लागले असून अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणूकीतील आपले नशिब आजवण्यासाठी चांगलेच सक्रीय झालेले आहेत. 

यंदा निवडणूकीनंतर सरपंच पदाची सोडत होणार असल्याने त्यादृष्टीने निवडणूकीचे आराखडे आखण्यात सर्वांचाच कस लागणार आहे. शिवाय काही इच्छुकांना सरपंचपदाचेही वेध असल्यामुळे त्यांच्याकडून निवडणूकीची जोरदार तयारी होताना दिसत आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया जशी जशी जवळ येत आहे तसे गावात निवडणूकीचे गरमा-गरम वारे आणखी वेगाने वाहायला सुरुवात झाली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!