दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सातारा । सातारा येथील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या आणि भरोसा सेलमध्ये कार्यरत माहिला पोलीस अंमलदार संगीता जेटाप्पा लोणार – काळेल या स्वंयपाक घरात गॅसचा भडका झाल्याने गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. दरम्यान, शनिवार, दि. १५ रोजी रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, संगीता लोणार – काळेल या भरोसा सेलमध्ये कार्यरत होत्या. बुधवार, दि. १२ रोजी त्या स्वयंपाक घरात असताना गॅसचा भडका झाल्याने गंभीर जखमी झाल्या. संगीता या पंचावन्न टक्के भाजल्यानेतर त्यांना तत्काळ उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर अधिक उपचारासाठी ससून सवार्ेपचार केंद्रात दाखल केले. गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संगीता लोणार – काळेल या भाजून जखमी झाल्यानंतर त्यांना कौटुंबिक त्रास अथवा वरिष्ठांचा त्रास होता की काय, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा येथे एका पत्रकार परिषदेत या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत असे काही नसल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले होते. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने सुरुवातीच्या काळात जो जबाब दिला आहे, त्यानुसार स्वयंपाक घरात भाजल्याने त्या जखमी झाल्याचे नमूद केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा सरकारी वकिलांच्या उपस्थितीत जबाब घेणार असल्याचे पोलीस अधीक्षक बंसल यांच्याकडून सांगण्यात आले होते.