दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांसाठी रविवार, दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित केलेला व्याख्यानाचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द करण्यात आला असून हा कार्यक्रम पुढील काही दिवसांत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती सकल ओबीसी समाज संघटनेकडून देण्यात आली आहे.
ओबीसी समाजाचे अभ्यासक व राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांचे ‘ओबीसी समाजाची आजची सामाजिक, राजकीय व शैक्षणिक परिस्थिती व मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्र’, याविषयी सविस्तर व सर्व ओबीसी समाज बांधवांना प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यान आयोजित करण्यामागचा उद्देश हाच होता की, आज आपण ओबीसी समाजबांधव जागृत झालो नाही तर भविष्यात ओबीसी समाजातील आपल्या भावी पिढीला खूप मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. आपण आज म्हणत आहे की, ओबीसी समाज हा ६२% आहे. मात्र, संख्येने जास्त असूनही आपल्या वरती राज्य सरकार अन्याय करीत आहे. याचे प्रमुख कारण असे आहे की, आपण एकत्रित येऊन संघटित झालेलो नाही.
हा व्याख्यानाचा कार्यक्रम येत्या काही दिवसांत आयोजित केला जाईल, असे सकल ओबीसी समाज संघटनेकडून सांगण्यात आले आहे.