मार्च 2020 मध्ये आलेला ‘कोरोना’ डिसेंबर महिना संपत आला तरी अजूनही जगात फैलावतच आहे. चिनमधून आलेला हा भयानक विषाणू सर्वत्र मोठ्या वेगाने फैलावला. यामुळे संपूर्ण भारताचे सन 2020 मधील एप्रिल, मे, जून हे तीन महिने लॉकडॉऊनमध्ये गेले. जुलैपासून लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होऊ लागले. आत्ता गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनावरील लस दृष्टीक्षेपात आली. कोरोना विषाणूची तीव्रताही काही प्रमाणात कमी होऊ लागली. आता जानेवारीत लस मिळणार आणि हळूहळू देश कोरोनामुक्त होणार असे मनोमन सर्वांनाच वाटू लागले होते. मात्र अशातच गेल्या काही दिवसांपासून दक्षिण अफ्रिका आणि ब्रिटनचा नवीन कोरोना संपूर्ण जगाची पुन्हा एकदा डोकेदुखी बनू पाहत आहे. सन 2020 हे वर्ष कोरोनाची लढण्यात गेले. नवीन 2021 वर्ष अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. नूतन वर्ष कोरोनामुक्त असेल असे जरा कुठे वाटत असताना आता कोरोनाच्या या नव्या प्रकाराने ‘भय इथले संपत नाही….’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
ब्रिटनमध्ये करोनाचा अतिशय झपाट्याने पसरणारा करोनाचा नवीन प्रकार आढळून आला. कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिम सुरु करुन कोरोनावर मात करण्याच्या उद्देशाने वाटचाल करणारा ब्रिटन अचानक नवीन रुपात आलेल्या कोरोनामुळे पुन्हा एकदा बॅकफुटवर गेला आहे. हा नवीन कोरोना फार वेगाने संक्रमीत होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेल्याने अनेक भागात बंधने वाढवण्यात येत असल्याचे वृत्त विविध माध्यमांमधून दिले जात आहे. शिवाय भरीस भर म्हणून अशाच प्रकारे नवीन व्हायरस दक्षिण आफ्रिकेतही वेगाने पसरत आहे. कदाचित यामुळेच ब्रिटनला करोनाच्या दुसर्या मोठ्या लाटेचा सामना करावा लागतोय, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. नवीन करोना व्हायरस पूर्वीच्या व्हायरसपेक्षा 70 टक्के अधिक वेगाने पसरतो, असं बोललं जातंय. गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेत जाऊन आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये हा नवीन प्रकारचा करोना व्हायरस समोर आला आहे.
थोडक्यात काय तर कोरोनाची दाहकता कमी होत आहे असे वाटताना पुन्हा एकदा नव्या स्वरुपात कोरोना आपले हात पाय फैलावेल का काय? अशी भिती जगातील सर्वच देशांना वाटणे स्वाभाविक आहे. कारण न भूतो न भविष्यती अशी विदारक परिस्थिती सर्वांनीच गेल्या काही दिवसांमध्ये अनुभवली आहे. आणि आता पुन्हा त्याच परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिकता आता ना प्रशासनाची आहे ना सर्वसामान्यांची आहे. मात्र ‘सिर सलामत तो पगडी पचास’ या उक्तीप्रमाणे जर कोरोनाने जीवघेणे स्वरुप पुन्हा एकदा विस्तारले तर नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या स्थितीत सर्वांना पुन्हा जावे लागेल.
राज्याचा विचार केला तर अजूनही कोरोना रुग्णांच्या व मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. शिवाय कोरोना बरा झाल्यानंतरही बर्याच जणांना त्रास होवून परिणामी प्राणही गमवावे लागत आहेत. यावरुन आपली वैद्यकीय यंत्रणा कोरोनाबाबतीत अजूनही 100% सक्षम नाहीत हे सिद्ध होते. त्यातच जर कोरोनाची नवीन लाट राज्यात उसळली तर काय होईल? याचा विचार करुन नागरिकांनी स्वत:हून कडक बंधने पाळणे गरजेचे आहे. एकीकडे शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यु सुरु केला आहे. गेल्या काही दिवसात ब्रिटनहून आलेल्या नागरिकांची शोधाशोध सुरु झाली आहे आणि दुसरीकडे या परिस्थितीत सुट्टीचा आनंद घ्यायला व नववर्षाचे स्वागत करायला महानगरातले अनेक महाभाग वेगवेगळ्या पर्यटनस्थळांवर मोठ्या गर्दीने जमले आहेत. खरं तर लसीकरण मोहिम सुरु होऊन तिचा परिणाम दिसून येईपर्यंत लोकांनी सबुरीने, फिकीरीने आणि जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
रोहित वाकडे, संपादक साप्ताहिक लोकजागर, फलटण.