
दुधातील भेसळ रोखण्यासाठी एफडीएने संपूर्ण पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला असून १८ निकषांवर तपासणीचे आदेश दिले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. १ ऑक्टोबर : राज्यातील ग्राहकांपर्यंत शुद्ध आणि सुरक्षित दूध पोहोचावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक पावले उचलली आहेत. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व सहआयुक्तांना आदेश देऊन उत्पादक शेतकऱ्यांपासून ते थेट अंतिम ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण साखळीत १८ प्रमुख मुद्द्यांवर कडक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे दूध भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
संपूर्ण पुरवठा साखळीवर पथकांची नजर
एफडीएची विशेष पथके आता दूध उत्पादक, संकलन केंद्रे, शीतकरण केंद्रे, प्रक्रिया प्रकल्प आणि वितरक या सर्व टप्प्यांवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. यामुळे भेसळीचा उगम नेमका कुठे होतो हे स्पष्ट होणार आहे. तपासणीदरम्यान गुणवत्ता निकषांत न बसलेले किंवा नाकारलेले दूध बाजारात अथवा उपपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाऊ नये, यासाठी असे दूषित दूध तातडीने नष्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नागरिकांना तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक उपलब्ध
दूध संकलनापासून ते वाहतुकीदरम्यान स्वच्छतेच्या व गुणवत्तेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियमभंग किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांना दुधात भेसळ आढळल्यास ती रोखण्यासाठी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ॲपद्वारे थेट ऑनलाइन तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



