नवीन पिढीमध्ये ब्लॉग रायटिंग विषयी आकर्षण; कोरोना सोबत जगण्याची सवय लावून घ्या : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : आता नवीन पिढीमध्ये ब्लॉग रायटिंग विषयी आकर्षण आहे. मी ही ब्लॉग वाचण्याचे काम करत असतो. हे पुस्तक सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून ब्लॉगवर टाकण्यात यावे. व्हाट्सअपच्या माध्यमातून इतर लोकांना वाचण्याकरिता उपलब्ध करून द्यावं, या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, आपण सर्वांनी कोरोना मुक्त राहूया व आता आगामी काळात कोरोना बरोबर जगण्याची सर्वानी सवय लावून घ्यावी असे आवाहन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 

देशांमध्ये तसेच संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तसेच लेखणीच्या माध्यमातून समाजातल्या विचारवंत लोकांनी आपले विचार या कोरोना विषयावर मांडलेले आहेत. अशाच एका कोरोना विषाणूवर आधारित प्रवास कोरोनाचा या पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हे प्रकाशन कलारत्न सहकारी मुद्रणालयाच्या प्रांगणामध्ये पार पडले. या पुस्तकाचे प्रकाशक अनुबंध कला मंडळ, फलटण असून याचे मुद्रण कलारत्न सहकारी मुद्रणालय यांनी केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकाचे संपादक प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले. तसेच या पुस्तका विषयी माहिती ब्रह्मानंद पराडकर यांनी दिली. पूर्वी अणु युद्धाची भीती वाटायची आता सगळेच देश ताकदवान आहेत. त्यामुळे एकामेकाला घाबरतात. आता अणु युद्ध  होणार नाही, परंतु समाजाला जी भीती आहे ती या विषाणूपासून आहे. या कोरोना विषाणूच्या संदर्भात जास्त बोलायचं म्हणजे आत्तापर्यंत जगामध्ये या विषाणू विषयी 100% खरी माहिती कोणाकडेही नाही. प्रवास कोरोनाचा हे पुस्तक समाजाला प्रेरणा देण्याचे काम करेल दिग्गज लोकांनी या मध्ये लिखाण केले त्यांचे अनुभव मांडले हा अतिशय चांगला उपक्रम आहे. असेही श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. 

प्रवास कोरोना या पुस्तकाच्या सोहळ्या करता मला बोलावले याचा मला खूप आनंद आहे या पुस्तकाची समाजाला गरज आहे. तसेच समाजा मधील नागरिकांनी कोरोनाची खूप धास्ती घेतली आहे की, आपण कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळताच काही लोकांना हृदय विकाराचा झटका आला आहे. हे दृश्य आपल्या सर्वांसाठी भयावह आहे. अशा परीस्थिती मध्ये विषाणूचा प्रसार होऊनये म्हणून रुग्णाची काळजी घ्यावी. त्याच्या परिवाराला सांभाळावे. हे काम करत असताना येणाऱ्या सामाजिक व प्रशासकीय अडचणी यांचा समतोल राखणे या करिता आम्हाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. यातून येणारे अनुभव आपण पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणावेत. या करिता मी सहकार मुद्रणालयाला विनंती करतो की आपण आमच्या अनुभवाचे एक पुस्तक प्रकाशन करावे. शासन व प्रशासन यांची काम करत असतानाची परिस्थिती समोर येईल, असे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.

 

कलारत्न सहकारी मुद्रणालयाच्या माध्यमातून चांगले कवी, विचारवंत, कलावंत,लेखक, यांना प्रकाश झोतात आणण्याचे काम आपण करत आहोत. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून काम करत असताना असंख्य लोकांशी संवाद झाला. परंतु सर्व लेखकांचे लेख आपल्याला या पुस्तकात प्रकाशित करता आले नाहीत. येणाऱ्या काळा मध्ये अजून नवीन पुस्तके आपण वाचकांना साठी आणणार आहोत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवांचे पुस्तक आम्ही लवकरात लवकर आणु असे आश्वासन कलारत्न सहकारी मुद्रणालयाचे चेअरमन संदीप जाधव यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल डफळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक निखिल येवले यांनी मानले. या कार्यक्रमाला कलारत्न सहकारी मुद्रणालयाचे संचालक व कर्मचारी, अनुबंध कला मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!