मागील उसाचे ३०१ रुपये दिवाळीपूर्वी द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा साखर कारखान्यांना इशारा


स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : गेल्या वर्षीच्या (२०२४-२५) गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता म्हणून प्रति टन ३०१ रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांना दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन यादव आणि जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुक्यातील श्रीराम, शरयू, स्वराज आणि दत्त इंडिया या सर्व साखर कारखान्यांना शुक्रवारी, दि. ३ ऑक्टोबर रोजी याबाबतचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, २०२४-२५ च्या हंगामासाठी कारखान्यांनी आतापर्यंत प्रति टन २१०० रुपये इतकी पहिली उचल दिलेली आहे. दुसरा आणि अंतिम हप्ता म्हणून  असलेले ३०१ रुपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाढलेली खतांचे दर, मजुरी आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, दिवाळी सणासाठी आणि चालू गळीत हंगामासाठी त्याला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कारखान्यांनी कोणताही बहाणा न करता ही रक्कम त्वरित अदा करावी, असे संघटनेने म्हटले आहे.

“जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेली मागणी मान्य केली नाही, तर फलटण तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या रोषाला आपणाला सामोरे जावे लागेल,” अशी स्पष्ट भूमिका निवेदनाच्या शेवटी मांडण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!