दैनिक स्थैर्य | दि. १८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आज जगाचे सेंद्रिय शेतीकडे लक्ष्य केंद्रित झाले आहे. सेंद्रिय शेतीत केमिकल आणि रासायनिक खतांचा वापर नसल्याने या प्रकारच्या शेती उत्पादनांना चांगली मागणी आहे. अशा प्रकारच्या उत्पादनांना रासायनिक शेती उत्पादनापेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून त्याचे उत्पादन घ्यावे व समृद्ध व्हावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांनी केले आहे.
तरडगाव (ता. फलटण) येथे फूड कोर्ट आणि मोर्फा सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र या नियोजित प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ आणि सेंद्रिय शेती करणार्या शेतकर्यांशी संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात खा. पवार बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे, कृषीतज्ज्ञ रवींद्र बर्गे, मोर्फाचे तज्ज्ञ संचालक युगेंद्रदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. शरद पवार पुढे म्हणाले की, जगात आज दोन प्रकारच्या शेती उत्पादनांना चांगली मागणी वाढली आहे. त्यामध्ये सेंद्रिय शेती उत्पादन आहे. आज सेंद्रिय शेती करणारे शेतकर्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, ते शेतकरी आपल्या शेती उत्पादनांना चांगला भाव घेऊन समृद्ध बनले आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीकडे लक्ष्य केंद्रित करावे. अशा प्रकारची उत्पादने विकण्यासाठी पुण्यात शेतकर्यांच्या एका समूहाने आपले स्वत:चे मार्केट बांधले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपल्याकडीलही शेतकर्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेती उत्पादने विकण्यासाठी आपली स्वत:ची इमारत बांधून मार्केट निर्माण करावे.
यावेळी परमेश्वर गायकवाड व पुरूषोत्तम कदम या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. या संवाद कार्यक्रमासाठी तरडगावसह व परिसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते.