स्थैर्य, सातारा, दि. ०७ : महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अनेक हाल या सोसावे लागत आहेत. शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे हे या सरकारला वाटत नाही. कोरोनाच्या संकटात शेतकरी वर्गाकडे पूर्णतः सरकारचे दुर्लक्ष आहे. त्याचा निषेध आम्ही रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनानुसार करत आहोत, अशी माहिती रयत क्रांतीचे प्रकाश साबळे यांनी दिली.
सातारा तालुक्यातील शिवथर येथे शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मारुती साबळे, तानाजी साबळे सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर मिळावा, बोगस सोयाबीन बियाणांच्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, बेदाण्याला प्रतिकिलो 200 रुपये बाजार भाव मिळावा, कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान मिळावे, खाजगी सावकार, बँक, फायनान्स यांची सक्तीची वसुली बंद करावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.