फरांदवाडी कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा : फिरोज शेख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.4: फरांदवाडी (ता.फलटण) येथील कृषिक्रांती कंपनीच्या ग्रेडिंग युनिटमध्ये गहू व इतर धान्य प्रतवारी करून जादा दर मिळवण्यासाठी या ग्रेडिंग युनिटचा तालुक्यातील शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी तालुका कृषि अधिकारी फिरोज शेख यांनी केले.
येथील फरांदवाडी कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी ग्रेडिंग युनिटचा शुभारंभ व बचत गट महिलांना लाभांश व बॅग वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे, कृषि पर्यवेक्षक रवींद्र बेलदार, कृषि सहाय्यक संजय अभंग, कंपनीचे संस्थापक दत्तात्रय राऊत, अनिल नाळे, ज्ञानेश्‍वर भोसले, राजेंद्र राऊत, विकास फरांदे, अनिल दळवे, बाळासाहेब राऊत, दत्तात्रय नाळे, दिलीप दळवे, मनीषा राऊत, छाया बोराटे, कविता राऊत, अश्‍विनी राऊत, रुपाली नाळे, शोभा राऊत, सुजाता राऊत, कविता नाळे उपस्थित होते.
फिरोज शेख बोलताना पुढे म्हणाले, ग्रेडिंग केल्याने उत्तम प्रतीचा शेतमाल बाजारात नेल्यास दरही नक्कीच चांगला मिळतो. कंपनीचे ग्रेडिंग युनिट उत्तम प्रतीचे असल्याने स्वच्छ व निवडक असा शेतमाल शेतकर्‍यांना प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आणून देत कंपनीचा स्मार्ट प्रकल्पात समावेश झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. प्रकल्प लवकरात लवकर सुरू करून गावात रोजगार निर्माण करावा व शेतकर्‍यांना विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी कृषि विभागाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही शेख यांनी दिली.
कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे यांनी कंपनीच्या प्रकल्पाची व योजनांची माहिती देताना कंपनी स्थापनेमध्ये महिला व ग्रामस्थांचे योगदान मोठे आहे. विशेषतः महिला बचत गटांच्या सहकार्याने कंपनीची स्थापना झाली असून नव्याने निवड झालेल्या कृषी विभागाच्या अंतर्गत स्मार्ट प्रकल्पात कंपनी मार्फत व्यवसाय करणेसाठी फरांदवाडी गावातील तरुणांनी पुढे येण्याचे अवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण बोराटे यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय राऊत यांनी केले तर शेवटी आभार जगदीश बोराटे यांनी मानले. कार्यक्रमात कंपनीचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, सचिव जगदिश बोराटे, व्यवस्थापक विजय राऊत, शेतकरी मित्र कपिल राऊत यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, कंपनीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!