
स्थैर्य, सातारा, दि. 20 : दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्यांंनी शेती बरोबरच औषधी वनस्पतींची लागवड करावी, असे आवाहन मंंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत यांनी केले.
येथील शेतकरी अंबादास बुटे यांच्या शेतात कृषी विभागाच्या सहकार्याने सुमारे दोनशे फळबाग व औषध वनस्पतींची लागवड केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी सहाय्यक यु. एम. तिकुटे, अंबादास बुटे, मदने व डी. के. कांबळे उपस्थित होते.अंबादास बुटे म्हणाले, बदलते वातावरण, वाढते प्रदूषण याकाळात वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतामध्ये करवंद, आंबा, नारळ, चिकू, रामफळ, सीताफळ, कडीपत्ता, जांभूळ व आवळा या रोपांचे रोपण केले असून या माध्यमातून नष्ट होत चाललेल्या वनस्पतींचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर या वनस्पतींच्या माध्यमातून देशी औषधेही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तरी औंध भागातील शेतकर्यांनी वृक्ष लागवडीकडे वळावे. यावेळी यु. एम. तिकुटे यांनीही माहिती दिली. शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.