
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यात जमिनीची मालकी नसलेल्या परंतु भाडेतत्त्वावर किंवा कराराने शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाही आता ‘फार्मर आयडी’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यामुळे शेतकरी सन्मान निधीसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थैर्य,सातारा, दि. ०९ नोव्हेंबर : महसूल अभिलेखांमध्ये स्वतःच्या नावावर जमीन नोंद नसलेल्या लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भाडेतत्त्वावर किंवा कराराने शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
योजनेची व्याप्ती आणि निकष
या निर्णयामुळे तांत्रिक व महसुली अडचणींमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीकविमा आणि आपत्ती मदत यांसारख्या शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यात प्रामुख्याने १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून प्रत्यक्ष शेती करणारे, अधिकृत भाडेपट्ट्याधारक, करार पद्धतीने शेती करणारे आणि कायदेशीर जमीन वाटप झालेले शेतकरी पात्र ठरणार आहेत.
कागदपत्र तपासणीची प्रक्रिया
पात्र शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार या तीन स्तरांवर केली जाईल. सर्व महसुली कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला कायमस्वरूपी फार्मर आयडी दिला जाणार आहे.





