
थेट WhatsApp वर मिळवा
महसूल अभिलेखात स्वतःच्या नावावर जमीन नसलेल्या परंतु प्रत्यक्ष शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना आता ‘फार्मर आयडी’ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, यामुळे शेतकरी सन्मान निधीसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०८ नोव्हेंबर : जमिनीच्या महसूल अभिलेखात नाव नसल्यामुळे आतापर्यंत फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणारे, कराराने शेती करणारे तसेच १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर
या नव्या निर्णयामुळे तांत्रिक व महसुली अडचणींमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य आणि कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून दूर राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रक्रियेअंतर्गत कागदपत्रांची तपासणी तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार या तीन स्तरांवर केली जाणार असून, सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कायमस्वरूपी फार्मर आयडी प्रदान केला जाईल.





