स्थैर्य, मुंबई, दि. 01 : बॉलिवूडमधील लोकप्रिय प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. 43 वर्षीय वाजिद यांनी मुंबईच्या चेंबूरमधील सुरराणा सेठीया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील अडीच-तीन महिन्यांपासून ते किडनी आणि घशामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे रुग्णालयातच होते. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून वाजिद व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती.
किडनीची वाजिद यांना समस्या होती. त्यामुळे त्यांच्यावर दोन वर्षांपूर्वी किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण किडनीमध्ये काही दिवसांपूर्वी इन्फेक्शन झाल्याने चार दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे मर्चंट यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाला संगीत देऊन १९९८ मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या गर्व, तेरे नाम, तुमको ना भूल पाएंगे, पार्टनर, दबंग सारख्या चित्रपटांची गाणी लिहिली, गायली शिवाय संगीतही दिले. अनेक चित्रपटांच्या गाण्यांची रचना केली होती. ईदच्या दिवशी रिलीज झालेले सलमान खान याचे प्यार करोना आणि भाई भाई गाणेही साजिद-वाजिद जोडीने कंपोज केले होते. त्यांच्या जोडीचे ते शेवटचे गाणे ठरले आहे. प्रसिद्ध संगीतकाराचे निधन झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये दुख:द वातावरण आहे. प्रियंका चोप्रा, वरूण धवन आणि प्रणिती चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी दुख व्यक्त केले आहे.