नायब तहसीलदारांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यासाठी चोरीचा बनाव

बनाव उघड करून तिच्यासह पाच जणांना बेड्या


दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा । चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणात एक-एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. ते 71 वर्षांचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार, तर ती 45 वर्षांची गृहिणी. नायब तहसीलदारांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यासाठी तिने चौघा तरुणांना सोबत घेऊन जबरी चोरीचा बनाव केला. मात्र, सातारा शहर पोलिसांनी तिचा बनाव उघड करून तिच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या.

नायब तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेले 71 वर्षीय गृहस्थ सातार्‍यात आपल्या कुटुंबासह वास्तव्य करत आहेत. एके दिवशी त्यांची ओळख 45 वर्षीय महिलेसोबत झाली. त्या महिलेने त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांना जाळ्यात ओढले. ती महिला सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांच्या घरात कोणी नसताना गेली. तिथे गेल्यानंतर तिने तिच्या साथीदारांना सेवानिवृत्त नायब तहसीलदारांची नजर चुकवून फोन केला. ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे चार जण त्यांच्या घरात आले.

त्यातील एका व्यक्तीने तुमच्याजवळचे सोने काढून द्या, असे म्हणत मोबाइलवर शूटिंग करण्यास सुरुवात केली. तुम्ही अश्लील चाळे करत बसलाय. तुमचे फोटो व व्हिडीओ शूटिंग केले आहे. हे सर्व व्हायरल करेन, अशी धमकी दिली.

त्यामुळे घाबरून गेलेल्या त्या सेवानिवृत्त नायब तहसीलदारांनी सोन्याची चेन, हातातील दोन अंगठ्या, असा सुमारे 2 लाख 70 हजारांचा ऐवज काढून दिला. एवढेच नव्हे, तर त्या महिलेनेही स्वतःच्या गळ्यातील दागिने त्यांच्यावर काढून दिले.

जेणेकरून आपली शंका येऊ नये, याची तिने खबरदारी घेतली होती. कारण, या प्रकरणातील करता करविता तीच होती, हे पुढे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर सातारा शहर पोलिसांनी तिच्यासह तिच्या चार साथीदारांना अटक केली.

यापूर्वी घडलेल्या अनेक हनी ट्रॅपच्या प्रकरणांत ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळले गेले, परंतु हे हनी ट्रॅपचे प्रकरण जरा वेगळेच असल्याचे पोलिस सांगताहेत.


Back to top button
Don`t copy text!