
स्थैर्य, सातारा, दि.21 ऑक्टोबर : स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका ही संघर्षपत्रिका असते. प्रत्येक प्रश्न तुमच धैर्य तपासत असतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला न घाबरता स्मार्ट हार्डवर्क करत आत्मविश्वासाने सामोरे गेले तर यश निश्चित मिळते, असा विश्वास भारतीय सांख्यिकी विभागात वर्ग एकचे पद मिळविलेल्या डिस्कळ येथील दीपाली आणि रूपाली कर्णे या जुळ्या भगिनींनी व्यक्त केला.
खटाव येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त अंबाबाई मंदिर सभागृहात आयोजित व्याख्यानात ‘स्पर्धा परीक्षेतील संधी आणि आव्हाने’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी किशोर काळोखे, अरुण आदलिंगे, डॉ. रामचंद्र कोरडे प्रमुख म्हणून उपस्थित होते.
रूपाली कर्णे म्हणाल्या,“ आजची पिढी मोबाईलमध्ये गुंतली आहे. यामुळे तरुणाई भटकत चालली आहे. तरुणांनी सोशल मीडियावर रील्स स्क्रोल न करता स्वतःचे चांगले भवितव्य स्क्रोल करणे गरजेचे आहे. मोबाईलऐवजी पुस्तकांना मित्र केले पाहिजे. यश मिळत नाही, तोपर्यंत मोबाईलवर वेळ वाया घालवू नका. मोबाईल व्यसन न बनता यशाचे साधन बनले पाहिजे. त्यामुळे तरुणांनी नोटिफिकेशनची वाट न पाहता अपॉईंटमेंट लेटरच्या मागे लागणे कधीही चांगले.”
दीपाली कर्णे म्हणाल्या,“ वाचन वाढले तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पुस्तकांच्या वाचनांसोबत सोशल अँक्टिव्हिटीही केल्या पाहिजेत. याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी फायदा होतो. सातत्यासाठी चिंतन आणि मनन केले पाहिजे. 17-18 तास अभ्यास केला म्हणजेच यश मिळतच असे नाही. त्यासाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांवर बर्डन नाही आणले पाहिजे. मुलांचे छंद जोपासा. त्यांची आवड बघून त्यांचे करिअर निवडा. मुळात एखाद्या विषयाची गोडी निर्माण झाली की त्या क्षेत्रात यश नक्की मिळते.” महिला पुढची पिढी घडवण्याचे काम करत असतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने फायनान्शियल इंडिपेंडंट बनले पाहिजे, असे मत कर्णे भगिनींनी व्यक्त केले.
जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते म्हणाले, एम. आर. शिंदे सरांचे विचार आजच्या आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. तेजपाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश कदम यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला विलास भोसले, बाळासाहेब शिंदे, जीवन इंगळे, मनोज देशमुख, रसूलभाई मुल्ला, अमीन आगा, प्रकाश जाधव, अॅड. एम. ए काझी, शरद कुदळे, शेखर देशमुख, मोहन घाडगे, नितीन सावंत, शंतनू फडतरे, प्रा.गंगाराम शिंदे, परशुराम बनकर, प्रा.महेश भदाणे, स्वप्नील करळे, प्रा. प्रवीण शेंडे, नाना जाधव, रमेश अडसूळ, राजेंद्र काळे, उत्तम कुदळे, अनिल लावंड, सर्जेराव शिंदे, युवराज शिंदे, किरण राऊत, अनूप शिंदे, बाळकृष्ण राऊत, मनोज शिंदे, नितीन शिंदे, भगवान शिंदे, विष्णू शिंदे, डॉक्टर सुनील शिंदे, रुपेश शिंदे, अमोल बनकर, चारुदत्त शिंदे आणि अंबाबाई मंडळाचे कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

