इंधन व गॅस सिलेंडरच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण : आमदार दीपक चव्हाण; संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या हाकेला फलटणमध्ये उस्फुर्त प्रतिसाद


स्थैर्य, फलटण, दि. २६ : केंद्रातील भाजपच्या सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करणारे जनविरोधी निर्णय घेतलेले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्या प्रचंड दरवाढीने सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधडीला लागले आहेत. या सर्व बाबींना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने आज शुक्रवार, दि.२६ मार्चच्या भारत बंदची हाक देण्यात आलेली होती. त्यास फलटणमध्ये उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मारक असणारे काळे कायदे त्वरित मागे घ्यावेत अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी केलेले आहे.

या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून फलटण शहरामध्ये आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून रॅलीची सुरवात झालेली होती. त्यानंतर छ. शिवाजी महाराज चौक, नाना पाटील चौक, रिंगरोड मार्गे गिरवी नाका, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह, सिटी बिल्डिंगच्या समोर असलेला श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा पुतळा, महात्मा फुले चौक, गजानन चौक, शंकर मार्केट, छ. शिवाजी वाचनालय, रविवार पेठ मार्गे जुना बारामती चौक, छ. शिवाजी चौक मार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप झाला.

माजी केंद्रीय कृषी मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली देशभर कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किसान मोर्चाने आज शुक्रवार दि.२६ मार्च रोजी आयोजित “भारत बंद” मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तसे आवाहन केलेले होते. महाराष्ट्र विधान परिषदचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात भारत बंद यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले होते. ह्या भारत बंदस फलटणकरांनी उस्फुर्त असा प्रतिसाद देऊन केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला, असेही फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

संयुक्त किसान मोर्चा या बॅनर खाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बांधव शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कायदे रद्द करणेबाबत आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत या आंदोलनात ३०० हुन अधिक शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. तरी केंद्र सरकारने हे कायदे त्वरित मागे घ्याव्यात, अशी मागणी सातारा जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या दरम्यान केली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, भीमदेव बुरुंगले, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, अजय माळवे, सनी अहिवळे, असिफ मेटकरी, किशोरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत रामराजे युवा मंचचे राहुल निंबाळकर, जगन्नाथ उर्फ भाऊ कापसे, माजी पंचायत समिती सदस्य बापूराव जगताप, फलटण प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष सुधीर अहिवळे, अनिल शिरतोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!