‘महाआवास’ अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । मुंबई । गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधून पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देऊन 5 लाख घरकुलांचे बांधकाम मिशन मोडवर पूर्ण करण्यासाठी महाआवास अभियानाला 5 जून, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना ज्यात रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, पारधी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व त्यांना पूरक पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना, आदी राबविण्यात येत आहेत. राज्यात या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतिमान अंमलबजावणी व गुणवत्तावाढीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2021 ते 1 मे, 2022 या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते व ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार व राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.

राज्यात आतापर्यंत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील 15 लाख 89 हजार लाभार्थींच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून 14 लाख 73 हजार लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे प्रदान करण्यात आले आहे व 11 लाख 19 हजार घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.

महाआवास अभियानामध्ये 5 लाख घरे पूर्ण करण्याचा मानस असून उर्वरीत घरकुले 5 जून पर्यंत पूर्ण करुन “मिशन झीरो” राबविणार असल्याचे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!