“राज्यातील माता मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी प्रयत्न करावे” – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । मुंबई ।  “सर्वसाधारणपणे डॉक्टर्स एकावेळी एकाच रुग्णाला सेवा देत असतात; परंतु प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ एकावेळी दोन जीवांना आरोग्य व जीवन देण्याचे पुण्यकार्य करीत असतात.

देशातील माता मृत्यूदर प्रति लक्ष १०३ इतका असला तरीही महाराष्ट्रात तो प्रतिलक्ष ३८ इतका कमी आहे. राज्याची या क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय अशीच आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील तज्ज्ञांनी हा माता मृत्यू दर आणखी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व त्या दृष्टीने शासनाला सूचना कराव्यात”, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

महिला आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील निवडक प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे गुरुवारी (दि. १३) सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

प्रसूतीतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांच्या “द असोसिएशन ऑफ ऑबस्टेट्रीक्स अँड गायनाकॉलॉजीकल सोसायटीज (AMOGS)” या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने यावेळी ३७ तज्ज्ञ व डॉक्टरांना ‘AMOGS – We for स्त्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

“भारतात आई, वडील आणि गुरूंनंतर वैद्य – डॉक्टरांना महत्त्व दिले गेले आहे. प्रसूतीमध्ये प्रसूती तज्ज्ञ व परिचारिका आईचे रक्षण व स्वस्थ बाळाला जन्म अशा दोन्ही कामात साहाय्यभूत होऊन उभयतांना नवजीवन देतात. आपले कार्य ही ईश्वरी सेवा मानून केल्यास त्यातून आनंदही मिळतो व यश देखील मिळते”, असे राज्यपालांनी सांगितले.

स्त्रीचा सन्मान जपत प्रसूती सेवा देण्याचा प्रयत्न : डॉ नंदिता पालशेतकर

“राज्याच्या ग्रामीण आणि सुदूर भागात प्रसुतीपूर्व सेवा देणे आव्हानात्मक काम असून या दृष्टीने प्रसूती तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञांची ‘अमॉग्स’ ही संघटना कार्य करीत आहे”, असे संस्थेच्या २०२०-२२ या काळातील अध्यक्ष डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितले. प्रसूती हा महिलेकरिता सुखद अनुभव असावा या दृष्टीने स्त्रियांचा आत्मसन्मान जपत प्रसूतीसेवा देण्याच्या दृष्टीने संघटना शासनाच्या सहकार्याने ‘लक्ष्य मान्यता’ हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. हृषिकेश पै, डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. आशा दलाल, डॉ. अनिल पाचणेकर, डॉ. अमेय पुरंदरे, डॉ. अनि बी, डॉ. आशा दलाल, डॉ. रोहन पालशेतकर आदींचा हस्ते सत्कार करण्यात आला.

सन २०२२-२४ या वर्षांकरिता संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह परदेशी तसेच निमंत्रित प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!